शिक्रापूर : आंतरजिल्हा घरफोडी करणारे बंटी-बबली जेरबंद

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाची नागपूरमध्ये कारवाई

शिक्रापूर (प्रतिनिधी) : आंतरजिल्हा तसेच महाराष्ट्राबाहेर सदनिका भाड्याने घेऊन घरफोडी करणाऱ्या बंटी बबली ला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. नवनीत मधुकर नाईक व प्रिया नवनीत नाईक असे या बंटी-बबली चे नाव असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात डिसेंबर 2018 मध्ये राहुल सदाशिव तावरे यांच्या घरी चोरी झाली होती. सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल तीन लाख छत्तीस हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेलेला असता याबाबत बारामती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता.

गुन्ह्यातील दोन आरोपी नागपूर येथे असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. त्यांनतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, पोलीस हवालदार रविराज कोकरे, उमाकांत कुंजीर, राजू मोमीन, जनार्दन शेळके, मंगेश थिगळे, विजय कांचन, अजित भुजबळ, अभिजित एकशिंगे, धीरज जाधव महिला पोलीस ज्योती बांबळे, दैवशाला डमरे, सुजाता कदम यांच्या यांनी नागपूर येथे जाऊन सदर ठिकाणच्या संशयितांना ताब्यात घेतले.

बंटी-बबली वर गुन्हे दाखल असलेली ठिकाणे….

लोणावळा, भोर, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई, सातारा, अमरावती, कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी, वाशिम, सांगली, नाशिक, जालना, बॅगलोर यांसह आदी ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

त्यांची नावे विचारली असता त्यांनी नवनीत मधुकर नाईक (वय ४० वर्षे) व प्रिया नवनीत नाईक (वय ३६ वर्षे,दोघे रा. रूम नंबर 2 विजय निवास रेडीस चाळ, शिवाजीनगर पश्चिम मुंबई) असे सांगितले. त्यांच्या दोघांकडे स्वतंत्र चौकशी केली असता त्यांनी बारामती येथील गुन्ह्याची कबुली दिली. दोघांना देखील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने अटक करण्यात आलेली आहे, तर त्यांच्यावर महाराष्ट्र सह बाहेरील राज्यात देखील गुन्हे दाखल असल्याचे समोर आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.