#CWC19 : भारताला मोठा धक्‍का; शिखर धवन विश्‍वचषकातून बाहेर

नवी दिल्ली – भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन दुखापतीतून न सावरल्याने विश्‍वचषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे. तो अद्याप तंदुरुस्त न झाल्याने तो विश्‍वचषकातील एकही सामना खेळू शकणार नाही. शिखर धवनच्या जागी ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात येईल.

दुखापत होवूनही भारताच्या 15 सदस्यीय संघातून त्याला काढून टाकण्यात आले नव्हते. तो दुखापतीतून बरा होईल अशी अपेक्षा टीम मॅनेजमेंटला होती. मात्र, गेल्या काही दिवसात त्याच्या दुखापतीत कोणताही बदल झाला नसल्याने संघ व्यवस्थापनाला हा निर्णय घ्यावा लागला आहे.

दरम्यान, शिखरला दुखापत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ऋषभ पंत याला इंग्लंडमध्ये बोलविण्यात आले होते. पण त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. आता शिखऱ स्पर्धेतून बाहेर पडल्याने ऋषभला संधी मिळाली आहे. परंतु तो प्लेईंग 11 मध्ये असेल की नाही याबाबत शंका आहे. कारण पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विजय शंकरला संघात स्थान मिळाल्यानंतर त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात चमकदार कामगिरी करत स्वताःचे स्थान पक्‍के केले आहे. त्यामुळे ऋषभला अंतिम संघात स्थान मिळवायला आणखीन वाट पहावी लागेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.