पंतप्रधान निधीला मदत करण्याचे आवाहन
नवी दिल्ली – करोनाशी दोन हात करत असलेल्या भारतातील रुग्णांना भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज क्रिकेटपटू शिखर धवन याने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मोठमोठे क्रिकेटपटू या कामी मागे हटले असले तरीही धवनने केलेल्या मदतीने करोनाग्रस्तांच्या संकटावर निश्चितच मायेची फुंकर घातली गेली आहे. धवनने केवळ मदतच केलेली नाही तर त्याने या कामी लोकांनी पुढाकार घ्यावा यासाठी त्याने पंतप्रधान निधीला मदत करण्याचे आवाहनही केले आहे.
करोनामुळे सामान्य नागरिकांनाच नव्हे तर क्रिकेटसह सर्व क्रीडाक्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. खेळापेक्षा माणसांचा जीव सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळे करोनाशी लढण्यासाठी आपण पुढे आले पाहिजे आणि देशाला मदत केली पाहिजे. त्याचबरोबर पंतप्रधान सहायक निधीला मदत करावी, असे आवाहनही धवनने केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवस लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. मात्र, तरीही करोना बाधितांची संख्या वाढतच आहे. सरकार तसेच सर्व यंत्रणा गरजूंना मदत करतच आहेत, पण एक नागरिक म्हणून आपणही या कामी सरकारची मदत केली पाहिजे, असेही धवनने व्यक्त केले आहे.
देशातील सर्व मोठ्या खेळाडूंसमोर एक आदर्श उदाहरण ठेवत खुद्द धवनने मोठी रक्कम पंतप्रधान निधीला दिली आहे. धवनने ट्विटर तसेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. नागरिकांनी घरातच थांबा. आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या, अशी पोस्टही धवनने केली आहे.