#व्हिडीओ : शिक्रापूरचा कचरा प्रश्न चिघळण्याचे चिन्ह

कचऱ्याच्या धुराने नागरिक व ग्रामस्थ हैराण
 शिक्रापूर (प्रतिनिधी ):  शिक्रापूर ता. शिरूर येथे गावातील संकलित केलेला सर्व प्रकारचा कचरा मनुष्यवस्ती जवळच गोळा करून पेटविला जात असल्याने होणाऱ्या धुरामुळे नागरिक त्रस्त झाले असून अनेक दिवसांपासून मागणी करून देखील कचऱ्याची समस्या मार्गी लागत नसल्याने अखेर ग्रामस्थ व महिला आक्रमक झाल्या असून आता शिक्रापूरची कचरा समस्या चिघळण्याचे चिन्ह दिसून येत आहे.


शिक्रापूर ता. शिरूर येथे गावातील गोळा होणारा कचरा अनेक वर्षांपासून येथील वेळ नदीपात्रामध्ये गोळा करून त्याच ठिकाणी जाळून कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे, परंतु येथे जाळल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या धुराचा येथील सोंडेमळा, महाबळेश्वर नगर, ग्रामीण रुग्णालय परिसर, कुंभार वाडा व परिसरातील नागरिकांना मोठा त्रास होत असून अनेकांना धुरामुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागला आहे, तसेच गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर देखील या कचरा टाकल्या जाणाऱ्या जागेपासून काही अंतरावर असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, याबाबत अनेकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी करून देखील कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, तर अनेकदा जाळल्या जाणाऱ्या कचऱ्याचे लोळ संपूर्ण गावामध्ये पसरत आहे त्यामुळे अनेकांना धुराच्या त्रासाला सामोरे जावे लागत असून अनेकांना वेगवेगळे आजार झालेले असून डासांचा उपद्रव येथे वाढलेला आहे.

तर येथून काही अंतरावर असलेल्या ग्रामीण रुग्णालय येथे देखील रुग्ण व नवीन बाळांना जन्म देणाऱ्या महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, तर याबाबत आज नुकतेच पुणे प्रादेशिक बाजार समितीचे संचालक बाळासाहेब चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या मिना सोंडे, माजी सदस्य सुभाष खैरे, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष प्रकाश सोंडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखा गायकवाड, अर्चना गजरे, सुनील शिर्के, दाउदभाई इनामदार, बाजीराव चव्हाण, रोहिदास जाधव यांसह आदींनी त्या ठिकाणी धाव घेत कचरा वाहतूक करणारी वाहने अडविली असून यावेळी येथील कचऱ्यामुळे नागरिक व मुलांना वेगवेगळे आजार झालेले असून येथील कचरा कायमस्वरूपी हटविण्याची मागणी केली आहे.

तर यावेळी बोलताना येथे आठवडे बाजार भरला जात असून बाजारामध्ये येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होत असून अनेकदा मागणी करून कचरा प्रश्न सोडविला जात नसून किती दिवस हे चालणार असा सवाल ग्रामपंचायत सदस्या मिना सोंडे यांनी केला आहे तसेच यावेळी बोलताना एक आठवड्यामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाने येथील कचरा दुसरीकडे हलवावा अन्यथा मोठे आंदोलन उभारून कचरा गाड्या अडवून सदर कचरा ग्रामपंचायत कार्यालय पुढे नेऊन टाकणार असल्याचा इशारा पुणे प्रादेशिक बाजार समितीचे संचालक बाळासाहेब चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या मिना सोंडे, माजी सदस्य सुभाष खैरे यांसह आदींनी दिला आहे.

कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध नाही – गुलाब नवले
शिक्रापूर ता. शिरूर येथील कचरा समस्येबाबत ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले यांच्याशी संपर्क साधला असता शिक्रापूर येथील कचरा टाकण्यासाठी पुरेसी जागा उपलब्ध नाही, जागा उपलब्ध होताच सदर कचरा दुसरीकडे हलविला जाईल असे ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले यांनी सांगितले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.