विवेकानंद काटमोरे
मांजरी (पुणे) – शेवाळेवाडी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे. त्यातच गाव महापालिकेच्या हद्दीत समावेश होण्याची अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. त्यामुळे संभ्रम अवस्थेत असलेल्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. गावच्या हनुमान मंदिरात आज सकाळी एकत्र येऊन घेतलेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे.
बुधवारी 23 डिसेंबर रोजी 23 गावे पालिकेत समावेश करण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यात शेवाळेवाडी गावचाही समावेश आहे. पुणे शहराच्या नवीन हद्दवाढीचे पूर्वेचे प्रवेशद्वार असलेल्या शेवाळेवाडी गावात ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया याआधीपासूनच सुरू आहे. पालिका समावेश आणि ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया एकाच वेळी सुरू असल्याने इच्छुक तसेच गावचे नेते आणि ग्रामस्थही गेले काही दिवस संभ्रमात आहेत. दि.23 ते 30 डिसेंबर अर्ज भरण्याचा कालावधीत असून 15 जानेवारीला मतदान होत आहे. असे असताना आज सर्वपक्षीय नेते, ज्येष्ठ ग्रामस्थ, इच्छुक आणि वेगवेगळ्या गटांच्या लोकांनी व सर्वच ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावच्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी पंढरीनाथ शेवाळे, अशोक मोरे, राहुल शेवाळे, विक्रम शेवाळे, अशोक शेवाळे, संजय शेवाळे, बबन शेवाळे, भारती शेवाळे, पोपट कामठे, प्रवीण चोरघडे, संजय कोद्रे, विजय कोद्रे, वसंत शेवाळे, अशोक शिंदे, अमित पवार,दिनेश भंडारी, रामभाऊ अक्काले,संजय कामठे, सचिन शेवाळे, जीवन शेवाळे, अक्षय शेवाळे, कुणाल शेवाळे, श्याम शेवाळे, अमोल शेवाळे, अविनाश कोद्रे, अमोल जगताप आदींसह गावातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार
निवडणूक आयोगाची या गावची निवडणूक रद्द झाल्याबद्दल अधिसूचना अजून जिल्ह्यधिकारी कार्यालयात आलेली नाही. जोपर्यंत अशी अधिसूचना येत नाही, तोपर्यंत शेवाळेवाडी ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया चालू राहील, असे हडपसरचे मंडल अधिकारी तथा शेवाळेवाडी व वडाची वाडी गावचे निवडणूक निर्णय अधिकारी व्यंकटेश चिरमुल्ला यांनी सांगितले.