- निवडणूक अधिकारी घेणार जिल्हाधिकाऱ्यांचा सल्ला
मांजरी – शेवाळेवाडीत एक जागेसाठी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एका जागेवर कुणाल संदीप शेवाळे हे 532 मत मिळून विजयी झाले आहेत. तर, प्रतिस्पर्धी उमेदवार वैभव मनोहर शेवाळे यांना 344 मते मिळाल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. 11 सदस्य संख्या असलेल्या शेवाळेवाडी ग्रामपंचायतसाठी यापूर्वी इतर 10 जागेवर एकही अर्ज आलेला नव्हता. त्यामुळे आजच्या निकालात एकच सदस्य विजयी झाला आहे.
यामुळे सदस्य संख्येच्या कोरम अभावी ग्रामपंचायत कारभार अस्तित्वात येणार की नाही? असे चित्र येथे निर्माण झाले असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा सल्ला घेणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी व्यंकटेश रामचंद्र चिरमुल्ला यांनी सांगितले.
महापालिकेत समावेश होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेवाळेवाडी ग्रामपंचायतीने अर्ज भरण्याच्या दिवशीच निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र, 11 सदस्यांच्या ग्रामपंचायतीसाठी एका वॉर्डातून 3 अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघारीच्या दिवशी एकाने माघारी घेतली, त्यामुळे उरलेल्य दोन उमेदवारांत लढत झाली. त्यामध्ये कुणाल शेवाळे विजयी झाले. परंतु, 11 सदस्य संख्य असलेल्या ग्रामपंचायतीसाठी आवश्यक असलेला कोरम पूर्ण होत नसल्याने प्रत्यक्षात एका सदस्यावर ग्रामपंचायतीचा कारभार अस्तित्वात येणार नाही.
दरम्यान, अशी परिस्थिती यापूर्वी कधीच निर्माण झाली नसल्याने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवून त्यावर निवडणूक आयोग ज्याप्रमाणे सूचना करेल त्याप्रमाणे कार्यवाही होईल, असे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
…तर पुन्हा निवडणूक
गाव महापालिकेत समाविष्ट होण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील सहा महिन्यांच्या आत गाव महापालिकेत गेल्यास असलेली ग्रामपंचायत बरखास्त होईल. गाव महापालिकेत समाविष्ट झाले नाही तर सहा महिन्यांच्या आत गावात इतर 10 जागेवर पुन्हा पोटनिवडणूक जाहीर होईल, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.