शेवगाव (प्रतिनिधी ) – कामाचे स्वरूप कंत्राटी असतानाही स्विकारलेल्या कामात झोकून द्यायचे हा स्थायीभाव अंगीकारल्यामुळे शेवगाव तालुक्यातील आशा सेविका, आरोग्य सेविका, डॉक्टर आदींनी करोना काळात केलेले काम स्तुत्य आहे. यातील २२ कर्मचाऱ्यांनी तर स्वतःला करोना झाल्यानंतर त्यावर मात करत पुन्हा एकदा रुग्णसेवा सुरु केली आहे. आरोग्यकर्मींच्या याच सेवेमुळे तालुक्यातील करोना बाधितांची संख्या आता एक आकडी झाली आहे.
लोकप्रतिनिधी मोनिकाताई राजळे, सभापती डॉ . क्षितिज घुले यांचे समवेत तहसीलदार अर्चना पागिरे ,गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ . सलमा हिराणी, ग्रामीण आरोग्य केंद्राचे डॉ . रामेश्वर काटे आणि आरोग्य विस्तार अधिकारी सुरेश पाटेकर, कल्याण मुटकुळे या सर्वांनी समन्वय साधून तालुक्यात काम केले आहे. त्यांना तालुक्यातील आशा, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, परिचर, आरोग्य सहाय्यक, प्रभारी आरोग्य पर्यवेक्षक यांनी मोलाची साथ दिली आहे.
अशाही काळात न घाबरता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता येथील समाजाला वैद्यकीय सेवा कमी पडली नाही. शेवटी हे काम करणाऱ्या व्यक्ती याच समाजातील सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांच्यापैकीही अनेकांना करोनाची बाधा झाली. तरीही येथील आरोग्य विभाग डगमगला नाही. आपल्यावरील करोनाचा हल्ला परतवून हे कर्मचारी पुनश्च नव्या दमाने समाजसेवेत उतरले आहेत.
या सेवकांनी बरे झाल्यावर क्वारन्टाईन असतानाही न थांबता ” वर्क फ्रॉम होम” सुरु करून रिपोर्टिंग तथा रुग्णाचे समुपदेशन अशी कामे केली आहेत.