शेवगाव : चिखल तुडवत तर कुठे बैलगाडीतून प्रवास करत तहसीलदारांनी केली पीक नुकसानीची पाहणी

अतिवृष्टीने ढोर जळगाव भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

शेवगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील ढोर जळगाव  भागात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी तसेच चार रस्त्याच्या वादांचे स्थळ यांचे निरीक्षण एखाद्या बांधावरुन न करता तहसीलदार अर्चना पागिरे यांनी चक्क गुडघाभर चिखल तुडवीत तर कुठे बैलगाडीतून प्रवास करत केले आहे.

तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने  सर्वजण मेटाकुटीला आले आहेत. पिकाच्या नुकसानी बरोबर  रस्त्यांचीही मोठी दैना झाली आहे. बहूतेक रस्ते चिखलात पूर्णपणे हरवले आहेत, अशाही स्थितीत लांब बांधावर न थांबता तहसीलदार पागिरे यांनी चक्क बैलगाडीत बसून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तसेच येथील चार रस्त्यांच्या वादाचे स्थळ निरीक्षणही आज केले आहे.

शेवगाव तालुक्यात गेल्या चार सहा दिवसात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र पाणीच पाणी झाले. अनेक ठिकाणी उभी पिके पाण्यात गेली असून जमिनी उपळू लागल्या आहेत. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आमदार मोनिकाताई राजळे यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना कालच दिल्या होत्या.

करोना महामारीच्या काळात सर्व जण घरात असतानाही शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केली. निसर्गानेही कृपा केल्याने त्यांनी लगबग करून, उधार उसनवारी करत पेरण्या उरकल्या.  पिकेही जोमात वाढली, मात्र नेमक्या याच वेळी पावसाने लावून धरले. रोजच खाडा न करता तो हजेरी लावत असल्याने बांध -बंधारे भरले असून ओढे-नाले वाहू लागले याबद्दल समाधान असले तरी जमिनीत पाणी जिरायला फुरसत मिळेनाशी  झाली. शेतात  साचून राहिलेल्या पाण्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,  अनेक ठिकाणची पिके पाण्यात बुडाली आहेत तर मोठी वाढ झालेली पीके  पिवळी पडली आहेत.

तहसीलदार पागिरे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे  करण्याबाबत तलाठी, मंडल निरीक्षकांनाआदेश दिले असून  आज स्वतः त्यांनी ढोरजळगाव भागात पिकाचे झालेले नुकसान व रस्त्यांचे हाल समक्ष अवलोकन केले . या रस्त्यावर गुडघाभर चिखल असतांनाही त्यांनी पाहणी दौरा अर्धवट न सोडता ढोरजळगाव, गरडवाडी, आव्हाने, निंबे नांदूर, वाघोली या नुकसानग्रस्त भागात   फिरून समक्ष पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत मंडल निरीक्षक रमेश सावंत, तलाठी शिल्पा आळंदे, सोनल  घोलवड, श्रीकांत गोरे  व परिसरातील शेतकरी होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.