शेवगाव -मोटारसायकल चोरीसह गावठी कट्ट्याच्या गुन्ह्यात संबंध नसतांनाही पोलिसांकडून गोवण्याचा होत असलेला प्रयत्न व त्यातून सुटण्यासाठी पैशाच्या मागणीवरून होणाऱ्या जाचाला कंटाळून शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील अल्पवयीन आदित्य अरूण भोंगळे (वय 16) या युवकाने गळफास घेवून आत्महत्या केली.
बुधवारी हा प्रकार उघडकीस आला. संप्तत झालेल्या आदित्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणला. नातेवाईक व कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करून मृतदेहावर पोलिसांच्या समोरच अंत्यविधी करण्याची भूमिका घेतली.
अखेर शेवगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी तपास करून पोलिसांवर कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहावर बालमटाकळी येथे अंत्यसंस्कार केले. शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील अल्पवयीन मुलाला मोटारसायकल चोरी व गावठी कट्ट्याच्या गुन्ह्यांमध्ये कुठलाही संबंध नसताना आपल्याला त्या गुन्ह्यात गोवण्यात येत असून या गुन्ह्यांमध्ये पोलिसांकडून पैशाची मागणी होत असल्याचे आदित्यने आपल्या आईला सांगितले होते.
त्यांनी काही पैसेही पोलिसांना दिले. परंतु आपली बदनामी होईल,या भीतीने आदित्य भोंगळे यांनी स्वतःची जीवन यात्रा संपवली, असा आरोप आदित्यच्या घरच्यांनी केला आहे. यावेळी नातेवाईकांनी मृतदेह शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये आणला. यावेळी कार्यकर्ते व मयताच्या नातेवाईकांनी शेवगाव पोलिसांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावाचे बनले होते. शेवगाव पोलिसांच्या समोर मृतदेहावर अंत्यविधी करण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली.
वातावरण तणावपूर्ण झाल्याने अखेर पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी आपण स्वतः तपास करून पोलिसांवर कारवाई करू,असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह गावाकडे अंत्यसंस्कारासाठी नेला. यावेळी शेवगावमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून मयताच्या नातेवाईकांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला.
यावेळी बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्रा. किसन चव्हाण, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अविनाश मगरे, ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश भोसले, रिपाइंचे तालुकाध्यक्ष पवन साळवे, वंचितचे तालुकाध्यक्ष शेख प्यारेलाल, भगवान मिसाळ, कैलास तिजोरे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारवाई न झाल्यास आंदोलन पीडित कुटुंबाला योग्य न्याय मिळाला नाही तर मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख ऍड. अविनाश मगरे यांनी दिला.
मी माझ्या बचत गटाचे पैसे घेऊन 50 हजार रुपये पोलिसांना दिले आहे. त्यामध्ये दोन हजार रुपये कमी होते तर माझ्या मुलाने फोन पे करून राहिलेले दोन हजार रुपये दिले आहेत.
– संगीता भोंगळे
दोषींवर योग्य कारवाई करणार ः मुंढे
भोंगळे यांचा पिस्तूल व चोरीच्या घटनेशी संबंध नसल्याचा खुलास करून दोषी पोलिसांवर योग्य ती कारवाई केली जाईल, मी स्वतः यामध्ये लक्ष घालून आहे. असे आश्वासन मयताच्या नातेवाईकांना दिले आहे. तसेच पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, असे शेवगाव पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.