पुणे , – दक्षिणेकडील राज्यात झालेल्या पावसामुळे शेवग्याच्या लागवडीला फटका बसला असून, बाजारात शेवग्याची आवक कमी प्रमाणावर होत आहे. मागणीच्या तुलनेत शेवग्याची आवक कमी प्रमाणावर होत असल्याने किरकोळ बाजारात एक किलो शेवग्याला प्रतवारीनुसार ५०० ते ६०० रुपये किलो असे भाव मिळाले आहे. यामुळे हॉटेलमधील सांबरातून शेवगा गायब झालेला दिसत आहे. तर गृहीणींनी शेवग्याच्या भाजीकडे पाठ फिरवली आहे.
शेवग्याची सर्वाधिक लागवड तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात होते. गुजरात, तसेच पुणे विभागातून शेवग्याची आवक होते. दाक्षिणात्य सांबारात शेवग्याचा सढळ हाताने वापर केला जातो. महाराष्ट्रातही आमटी, सांबर आणि भाजीसाठी शेवग्याचा वापर केला जातो. एरवी १०० ते १२० रुपये किलो असा भाव शेवग्याचा असतो. दक्षिणकडील राज्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला. परतीच्या पावसाचा फटका शेवग्याला बसला., असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी सांगितले.
घाऊक आणि किरकोळ बाजारात शेवग्याची पंधरा दिवसांपासून आवक टप्याटप्याने कमी होत गेली. रविवारी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातून २ टेम्पो शेवग्याची आवक झाली. एरवी दक्षिणेकडील राज्यातून साधारपपणे पाच ते सहा टेम्पो शेवग्याची आवक होते. पुण्यासह नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेवग्याची आवक कमी प्रमाणावर होत आहे.
हवामान बदलामुळे शेवग्याच्या लागवडीत घट झाली आहे. सध्या गुजरातमधील शेवग्याचा हंगाम सुरू झाला आहे. गुजरातसह सोलापूर जिल्ह्यातून शेवग्याची तुरळक आवक बाजारात होत आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत शेवग्याची आवक कमी प्रमाणावर होत आहे. एरवी बाजारात राज्य, तसेच परराज्यातून दररोज चार ते पाच टन शेवग्याची आवक होते. मात्र सध्या ७०० ते ८०० किलो शेवग्याची आवक होत आहे. डिसेंबर महिना अखेरीस शेवग्याची आवक टप्याटप्याने वाढेल, त्यानंतर शेवग्याच्या दरात घट होईल.
– रामदास काटकर, शेवगा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड