शेट्टींनी अक्‍कल नसल्याचे दाखवले

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची टोकाची टीका

दौंड – शेट्टींनी आरोप-प्रत्यारोप जरूर करावेत; परंतु, खोटी माहिती समाजासमोर आणू नये, अशी माहिती ते समाजासमोर आणत असल्याने उरलीसुरली त्यांची अक्कलही शिल्लक नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. राजू शेट्टी यांनी नार्को टेस्टला तयार व्हावे म्हणजे ते खरे बोलतात की नाही, हे समाजासमोर स्पष्ट होईल, असे आव्हान राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले आहे.

दौंड येथील आयोजित पत्रकार परिषदेत राज्यमंत्री खोत बोलत होते. यावेळी त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच कडकनाथ कोंबडी अपहाराबाबत विचारले असता त्यांनी माजी खासदार शेट्टी यांच्या विरोधात संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, राजू शेट्टींना चिकन खूप आवडते; त्यामुळे त्यांनी माझ्या विरोधात कडकनाथचा मुद्दा घेतला आहे.

ज्या कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली त्या कंपनीच्या नावातील रयत क्रांती संघटनेच्या नावाशी साधर्म्य असल्याचा आधार त्यांनी घेतला आहे. मात्र, इंटरनेटवर पाहिले तर दोनशे कंपन्याच्या नावांमध्ये रयत हा शब्द आलेला आहे. रयत हा आमचा ट्रेडमार्क नाही, त्यामुळे राजू शेट्टी यांचे नेतृत्व हे अभ्यासू नसून आभासी असल्याची टीकाही त्यांनी केली. त्या कंपनीशी माझे कुटुंब किंवा नातेवाईकांचा संबंध नसल्याचेही खोत यांनी स्पष्ट केले.

जर, राजू शेट्टी रयतचा संबंध त्या कंपनीशी लावत असतील तर त्यांनी सांगावे की रयत शिक्षण संस्था ही सुद्धा माझीच आहे आणि त्यांनीच मला त्या संस्थेचा ताबा द्यावा. कडकनाथ कोंबडी प्रकरणातील त्या कंपनीची सीआयडीमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचेही खोत यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी पोलिसात फिर्याद द्यावी, जेणेकरून वस्तुस्थिती समोर येईल व त्या कंपनीवर कायदेशीर कारवाई होईल. मागील तीन वर्षाच्या कार्यकाळात मी कोणतीही संस्था काढली नसल्याचेही खोत यांनी आवर्जून सांगितले.

शिल्पा शेट्टी ही राजू शेट्टींची बहीण म्हणायची का?

कडकनाथ कोंबडी अपहार करणाऱ्या कंपनीचा आणि संघटनेच्या नावातील साम्य साधण्याचा प्रयत्न करून माजी खासदार राजू शेट्टी हे माझ्यावर आरोप करीत आहेत. मग, शिल्पा शेट्टी ही राजू शेट्टींची बहीण म्हणायची का? असे म्हणून संतोष शेट्टी त्यांचा भाऊ आहे का, असाही प्रश्‍न खोत यांनी उपस्थित केला. 

Leave A Reply

Your email address will not be published.