संचालक मंडळाच्या बैठकीत दोघांचीही बिनविरोध निवड
निवृत्तीनगर -जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सत्यशील सोपानशेठ शेरकर यांची तर उपाध्यक्षपदी अशोक भगवंत घोलप यांची बिनविरोध निवड करण्यात आली, अशी माहिती अध्यासी अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर-2 च्या स्नेहा जोशी यांनी दिली.
श्री विघ्नहर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत अध्यक्ष शेरकर यांच्या नेतृत्वाखालील शिवनेर पॅनलचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर 16 उमेदवार मोठ्या फरकाच्या मताधिक्क्याने विजयी झालेले आहेत. गुरूवारी (दि. 20) सकाळी 11 वाजता निवृत्तीनगर येथील कारखाना सभागृहामध्ये पदाधिकारी निवडीकरिता विघ्नहर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालकांची अध्यासी अधिकारी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. श्रीखंडे यांच्या उपस्थितीत बैठक बोलाविण्यात आली होती.
सभासद, ऊस उत्पादकांनी मी व माझ्या सहकारी संचालकांवर विश्वास दाखवून शेतकरीवर्गाची काळजी घेणारे संचालक मंडळ निवडून दिले, त्याबद्दल सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरीवर्गाचे आभार मानतो. कारखान्याचे सभासद हेच कारखान्याचे मालक आहेत. आम्ही निवडून आलेले संचालक हे सर्वांचे विश्वस्त म्हणून पारदर्शकपणे कामकाज करणार आहोत. स्व. निवृत्तीशेठ यांनी भूषविलेल्या खुर्चीचा मानसन्मान ठेवून शेतकरी हिताचे कामकाज केले जाईल.
– सत्यशील शेरकर,
अध्यक्ष, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना, निवृत्तीनगर