वडगाव हवेली (वार्ताहर) – देशभरासह राज्यात करोना विषाणूंमुळे हाहाकार उडाला आहे. जिल्ह्यात करोनाचा फैलाव वेगाने होत असून ट्रॅव्हल हिस्ट्री असणाऱ्या नागरिकांमुळे स्थानिक नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. शनिवारी शेरे स्टेशन येथील एकाच कुटुंबातील तीन जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शेणोली स्टेशनसह संपूर्ण शेरे, शेणोली ही गावे दहशतीखाली वावरत आहे.
जिल्ह्यात करोना विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे. मोठ्या संख्येने बाधित रुग्णांची नव्याने भर पडू लागली आहे. मोठया संख्येने करोनाचा संसर्ग असणाऱ्या मुंबई, ठाणे, पुणे यासह अनेक ठिकाणाहून नागरीकांना गावी येण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने ऑनलाईन अर्ज करुन नागरीकांना जिल्हाबंदी असतानाही गावी जाण्यास काही अटीशर्तीवर परवानगी दिली आहे. असे असतानाही अनेक जण बेकायदेशीर मार्ग अवलंबून हजारोंच्या संख्येने जिल्ह्यात दाखल होत आहेत.
शेरे-शेणोली स्टेशन येथील एक कुटुंब असेच मुंबईहन गावी परतणारे ट्रॅव्हल हिस्ट्री असणारे कुटुंब आहे. एकाच कुटुंबात सतरा जण सदस्य आहेत. या कुटुंबातील सदस्यांची माहिती ग्रामपंचायत व आपत्कालीन व्यवस्थापन समितीने आरोग्य यंत्रणेस दिल्याने प्रशासनाने त्यांना क्वारंटाइनचे शिक्के मारुन घरीच होमक्वारंटाइन राहण्यास सांगितले होते. या कुटुंबातील पाच जणांना करोना सदृश्य त्रास होऊ लागल्याने त्यांनी वडगाव हवेली प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली.
याठिकाणी असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून तातडीने त्यांना कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. शनिवारी या पाच पैकी तीघांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याने शेरे स्टेशन व परिसरात एकच खळबळ उडाली. बाधित रूग्ण आढळल्याने शेरे-शेणोली विभाग बंद ठेवण्यात आला आहे.
————