रेडा – इंदापूर शहराच्या बाह्यवळण नजीक मेंढपाळ रिकाम्या शेतात मेंढ्या घेवून बसला असताना येथील एका हॉटेल चालकाने, माझ्या शेतात मेंढ्या का घातल्या म्हणून 15 ते 20 नातेवाईकांची टोळी बोलवून मेंढपाळास व त्याच्या कुटुंबाला जबरी मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि. 12) दुपारी 12च्या सुमारास घडली.
या मारहाणीत एक महिला व मेंढपाळ गंभीर जखमी झाला आहे, त्यानंतर मारहाण केल्याप्रकरणी मेंढपाळाने महामार्गावर मेंढ्या घालून रस्ता रोको करुन निषेध केला. यावेळी हॉटेल मालकाच्या लोकांनी मेंढपाळाच्या नऊ मेंढ्या व एक शेळी पळवून नेली. इंदापूर पोलीस ठाण्यात धनगर समाजातील लोकांनी व त्या हॉटेल व्यवसायिकाच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. जखमी मेंढपाळ रामा बापू मदने यांना इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमीची अवस्था गंभीर असल्याचे सांगितले मदने यांना पोटात, पाठीत लाथा बुक्क्यांचा गंभीर मुका मार लागल्याने ते बेशुद्ध अवस्थेत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. री देखील इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. याबाबत बड्या हॉटेल चालकाला विचारले असता, आमचे सर्व मिटले आहे, असे त्याने सांगितले.
युवा नेत्याची मध्यस्थी करून तडजोड
इंदापूर मधील एका शेठजी जवळील एक युवा नेता अशा गरिबांना मारहाणीच्या घटना घडल्या की, तात्काळ पीडितांशी संपर्क साधतो व वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून, तडजोडी करतो. घटनेच्या गांभीर्याशी या नेत्याला काही देणेघेणे नसते. फक्त, मध्यस्ती करून संबंधितांना अशा प्रकरणातून कसे बाहेर काढता येईल, असाच प्रयत्न असल्याने इंदापूरकरांनी अनुभवले आहे. या युवा नेत्याची अशा प्रकरणात तडजोडी करण्यासाठी नेमकं कोण पाठबळ देते? याचा शोध घेणे गरजेचे असल्याची भावना पीडित बोलून दाखवत आहेत.