शेलपिंपळगावला भरधाव टेम्पो नदीत कोसळला

पाण्यात बुडून एकाचा मृत्यू, एक गंभीर ः टेम्पोचालकावर गुन्हा दाखल

महाळुंगे इंगळे  -चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने चाकण – शिक्रापूर रस्त्यावरील शेलपिंपळगाव (ता. खेड) गावच्या हद्दीतील भामा नदीवरील लोखंडी ग्रील तोडून टेम्पो थेट नदीत कोसळला. रविवारी (दि. 15) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात टेम्पोतील एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या टेम्पो चालकावर या अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान क्रेनच्या सहाय्याने चाकण पोलिसांनी चुराडा झालेला सबंधित टेम्पो नदीतून बाहेर काढला.

क्षितीज शिवाजी केसरकर (वय 30, रा. शिवाजीनगर, मुंबई) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या संजय नरेंद्र रॉय (वय 32, रा. शिवाजीनगर, मुंबई) या टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णवाहिका चालक सुजित अनिल काळे (वय 23, रा. राणूबाईमळा, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

संजय रॉय हा रविवारी (दि. 15) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिक्रापूर बाजूकडून आयशर कंपनीचा टेम्पो (एमएच 48 बीएम 1388) घेऊन चाकणकडे येण्याच्या प्रयत्नात होता; मात्र भरधाव टेम्पो वरील ताबा सुटल्याने शेलपिंपळगावच्या हद्दीतील भामा नदीवरील लोखंडी ग्रील तोडून टेम्पो थेट नदीत कोसळला.

Leave A Reply

Your email address will not be published.