Pimpri | सलग दोनदा निवडून येणारे शेळके पाचवे आमदार

मावळ, – महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर झाला. मावळ विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्यासह विजय मिळवित महायुतीचे उमेदवार सुनील शेळके सलग दुसऱ्यांदा आमदार झाले. यासोबत आमदार सुनील शेळके यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्यातही शेळके हे मावळ विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे पाचवे आमदार ठरले आहेत. यापूर्वी हा मान कृष्णराव भेगडे, मदन बाफना, दिगंबर भेगडे आणि बाळा भेगडे यांना मिळाला होता.
मावळ विधानसभा मतदारसंघाचा १९५२ पासूनचा इतिहास मोठा रंजक आहे. मावळात ७२ वर्षात ११ आमदार झाले. १९५२ ते १९६७ ही सुरुवातीची पंधरा वर्षे मावळ व मुळशी असा संयुक्त विधानसभा मतदारसंघ होता. आजवर झालेल्या आमदारांमध्ये पाच आमदार हे दोनदा निवडून आलेत. परंतु आजवर एकाही आमदाराला हॅटट्रीक करता आलेली नाही.
मावळ-मुळशीचे प्रथम आमदार म्हणून तळेगाव दाभाडे येथील सरदार घराण्यातील श्रीमंत सरदार वीरधवल राजे दाभाडे हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. मावळचे पहिले आमदार होण्याचा मान त्यांना जातो. त्यानंतर १९५७ साली संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार म्हणून जनसंघाचे रामभाऊ म्हाळगी विजयी झाले. १९६२ च्या निवडणुकीत काँग्रेसचे मामासाहेब मोहोळ आमदार म्हणून निवडून आले.
सन १९६७ मध्ये मावळ हा स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाला. पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे रघुनाथराव सातकर विजयी झाले. १९७२ ला जनसंघाचे उमेदवार कृष्णराव भेगडे विजयी झाले. १९७६ मध्ये त्यांनी समाजवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि १९७८ साली कृष्णराव भेगडे हे समाजवादी काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. या दोन्ही वेळी भेगडे हे विजयी झाले. त्यामुळे सलग दोनदा आमदार होण्याचा पहिला मान कृष्णराव भेगडेंना मिळाला.
सन १९८० साली काँग्रेस (आय) पक्षाच्या तिकीटावर ॲड. बी. एस. गाडे पाटील यांनी कृष्णराव भेगडे यांचा पराभव केला. त्यावेळी भाजपच्या वतीने विश्वनाथ भेगडे हे देखील रिंगणात होते. त्यानंतर १९८५ आणि १९९० साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ॲड. मदन बाफना हे सलग दोन्ही वेळी आमदार म्हणून निवडून आले.
त्यानंतर सन १९९५ ची निवडणूक ते २०१९ ची विधानसभा या दरम्यान झालेल्या पाच निवडणुका भारतीय जनता पक्षाने जिंकल्या. यात सन १९९५ मध्ये रूपलेखा ढोरे निवडून आल्या. त्यानंतर १९९९ ते २००९ या काळात दिगंबर भेगडे यांनी सलग दोनदा मावळचे प्रतिनिधित्व केले. तर, २००९ ते २०१९ या दहा वर्षांमध्ये बाळा भेगडे सलग दोन वेळा निवडून आले.
शेळकेंनी उध्वस्त केला भाजपाचा गड
२०१९ मधील मावळची निवडणूक ही ऐतिहासिक ठरली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढलेले सुनील शेळके यांनी भाजपाची २५ वर्षांची सत्ता उलथवून लावली. २०१९ साली भाजपाने उमेदवारी नाकारल्यामुळे सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली व बाळा भेगडे यांना पराभूत केले. त्यानंतर यंदा झालेल्या विधानसभेत शेळकेंनी बापूसाहेब भेगडेंना पराभव केला. यासह शेळके सलग दुसऱ्यांदा मावळचे आमदार बनले आहेत.
मावळ विधानसभा मतदारसंघातील आजपर्यंतचे आमदार
क्रमांक – आमदाराचे नाव – कार्यकाळ – पक्ष
१. वीरधवल राजे दाभाडे सरकार – १९५२ ते १९५७ – अपक्ष
२. रामभाऊ म्हाळगी – १९५७ ते १९६२ – भारतीय जनसंघ
३. मामासाहेब मोहोळ – १९६२ ते १९६७ – काँग्रेस
४. रघुनाथ दादा सातकर – १९६७ ते १९७२ – काँग्रेस
५. कृष्णराव भेगडे – १९७२ ते १९७८ (जनसंघ), १९७८ ते १९८० (काँग्रेस)
६. ॲड बी एस गाडे पाटील – १९८० ते १९८५ – काँग्रेस
७. ॲड मदन बाफना – १९८५ ते १९९० आणि १९९० ते १९९५ (काँग्रेस)
८. रूपलेखा ढोरे – १९९५ ते १९९९ – भाजपा
९. दिगंबर भेगडे – १९९९ ते २००४ आणि २००४ ते २००९ – भाजपा
१०. संजय तथा बाळा भेगडे – २००९ ते २०१४ आणि २०१४ ते २०१९ – भाजपा
११. सुनील शेळके – २०१९ ते २०२४ आणि २०२४ पासून पुढे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष





