नवी दिल्ली – दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेली ही पहिलीच भेट होती. यावेळी दीक्षित यांनी दिल्लीतील पाणी आणि विजेच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
राज्य सरकारने दिल्लीतील सामान्य जनतेचे सहा महिन्यांचे वीज बिल माफ करावे अशी मागणी त्यांनी केली. सन 2013 साली शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना विजेच्या प्रश्नावर केजरीवालांनी त्यांची भेट मागितली होती पण त्यावेळी दीक्षितांनी त्यांना भेट नाकारली होती.पण आज मात्र केजरीवारांनी शीला दीक्षितांना भेट देऊन त्यांच्याशी सविस्तर या विषयावर चर्चा केली. कॉंग्रेस नेत्यांनी जे जे प्रश्न उपस्थित केले त्या सर्व प्रश्नांवर केजरीवालांनी तांत्रिक तपशीलासह माहिती दिली.