शेख नवाफ कुवेतचे नवे राजे

दुबई – आपल्या प्रदीर्घ राजवटीनंतर अलिकडेच निधन झालेले कुवेतचे दिवंगत राजे शेख सबाह अल अहमद अल सबाह यांच्या जागी कुवेतचे नवीन राजे म्हणून शेख नवाफ अल अहमद अल सबाह यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. ते दिवंगत राजांचे सावत्र भाऊ आहेत.ते 83 वर्षांचे आहेत.

त्यांनी आज संसद भवनात झालेल्या एका कार्यक्रमात आपली सूत्रे स्वीकारत शपथ घेतली. आपल्या दिवंगत बंधुराजांच्या धोरणानुसारच कुवेतचा कारभार आपण पहाणार आहोत असे त्यांनी शपथविधीच्यावेळी केलेल्या छोटेखानी भाषणात नमूद केले.

अत्यंत अवघड आर्थिक परिस्थितीत त्यांना देशाची धुरा सांभाळावी लागत आहे. आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थांनी कुवेतची पत कमी झाल्याचे निर्देशित केले असून कुवेतच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे. कुवेत सरकारच्या आर्थिक व्यवस्थापनावर तसेच अंदाजपत्रकातील वाढत्या तुटीवर बोट ठेवत पत मानांकन संस्थांनी कुवेतचे डिग्रेडेशन केले आहे.

कुवेत हा अत्यंत छोटा देश असला तरी तो एक तेलसंपन्न देश असल्याने तो एक सधन देश मानला जात होता. पण अलिकडच्या काळात घसरलेले तेलाचे दर व तेलाची जगभर मंदावलेल्या मागणीमुळे कुवेतपुढे सध्या अनेक आर्थिक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. ती सारी आव्हाने तेथील नवीन राजांना पेलायची आहेत.

नवीन राजांनी या आधी देशाच्या मंत्रिमंडळात अंतर्गत व्यवहार मंत्री व संरक्षण मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांना फेब्रुवारी 2006 रोजी क्राऊन प्रिंस म्हणून घोषित करण्यात आले होते. आता नवीन राजे कोणाला क्राऊन प्रिंस जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.