ढाका : बांगलादेशचे संस्थापक बंगबंधू शेख मुजीबुर रेहमान यांच्या हत्येबद्दल फाशीची शिक्षा ठोठावलेल्या बांगलादेश लष्करातील माजी कॅप्टन अब्दुल मजेद याच्या नावे आज “डेथ वॉरंट’ जारी करण्यात आले. मजेद याला मंगळवारीच ढाक्यामध्ये अटक करण्यात आले आहे. गेल्या अडीच दशकापासून तो भारतातच लपून राहिला होता.
बांगलादेशात परतल्यानंतर लगेचच त्याला अटक करण्यात आली होती. अटकेनंतर कडेकोट बंदोबस्तात त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. करोनाच्या साथीमुळे सर्वोच्च न्यायालयाला सध्या सुटी आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष परवानगीने ढाक्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश हेलाउद्दीन चौधरी यांनी अब्दुल मजेदसाठी “डेथ वॉरंट’ जारी केले.
मजेदसह 6 जण फरार असतानाच त्यांच्यावर रेहमान यांच्या हत्येचा खटला चालवला गेला होता. आणि 1998 साली त्यांच्या नावे फाशीची शिक्षाही दिली गेली होती. त्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळचे आरोपपत्र आणि मूळ निकालपत्राचे न्यायाधीशांनी वाचन केले आणि नंतर “डेथ वॉरंट’जारी केले. त्यानंतर मजेदला तुरुंग अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले. मजेद याला तातडीने ढाकाच्या बाहेरील काशिमपूर मध्यवर्ती कारागृहात परत आणण्यात आले. तेथेच त्याला फासावर लटकवले जाणार आहे, असे कोर्टाचे अधिकारी व पोलिसांनी सांगितले.