Bangladesh Violence | बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळला असून, अराजकता निर्माण झाली आहे. हजारोंच्या संख्येने आंदोलनकर्ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाले. दरम्यान पंतप्रधान शेख हसीना यांनी याआधीच देश सोडला होता. लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून त्यांनी थेट भारत गाठला आहे. त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामाही दिला आहे.
देशातील गंभीर परिस्थिती पाहता बांगलादेशी लष्कराने देशाची कमान आपल्या हाती घेतली आहे. दरम्यान, शेख हसीना यांचे पुत्र साजिब अहमद वाजेद जॉय यांनी मोठं वक्तव्य केले आहे. यावेळी साजिब अहमद वाजेद यांनी त्यांची आई शेख हसीना कदाचित आता बांगलादेशच्या राजकारणात परतणार नसल्याचे म्हंटले आहे. साजिब वाजेद हे काही वर्षांपूर्वी शेख हसीना यांचे सल्लागार म्हणून काम पाहायचे.
साजिब वाजेद जॉय काय म्हणाले?
साजिब अहमद वाजेद जॉय यांनी सांगितले की, “बांगलादेशात सुधारणा करण्यासाठी त्यांचे महत्त्वपूर्ण प्रयत्न असूनही त्यांना अशा समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. देशात बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी आतोनात प्रयत्न केले, तरी त्यांच्याविरोधात आंदोलन चालूच आहे. सरकारविरोधातील लोकांच्या टोकाच्या रोषामुळे निराश होऊन त्यांनी पंतप्रधानपद सोडण्याचा निर्णय घेतला.”
“माझ्या आईने देशाची कमान आपल्या हाती घेतल्यानंतर देशात अनेक सकारात्मक बदल घडवून आणले. आई पंतप्रधान झाली तेव्हा बांगलादेश हा जगातील अपयशी देशांच्या यादीत होता. हा एक गरीब देश मानला जात होता. परंतु, आता आपला देश आशिया खंडातील उदयोन्मुख देशांपैकी एक आहे. आपल्या देशाने अनेक आघाड्यांवर मोठी प्रगती केली आहे,” असेही साजिब अहमद वाजेद जॉय यांनी म्हंटले.
अस्थिरतेचे नेमके कारण काय?
शासकीय नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये अराजकता माजली आहे. १९७१ साली बांगलादेशची निर्मिती झाली. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे मत आहे. तर हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे मत आहे.
बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रमात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना बांगलादेशमध्ये ३० टक्के आरक्षण मिळते. या देशात धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना ५ टक्के आरक्षण दिले जाते. एक टक्का आरक्षण दिव्यांगांना दिले जाते. मात्र आरक्षणाचा मुद्दा तापल्याने देशातील संपूर्ण वातावरण बिघडलं आणि हिंसाचार, जाळपोळीच्या घटनांनी बांगलादेशच्या पंतप्रधानांना देश सोडण्याची वेळ आली.
हेही वाचा: