नवी दिल्ली – बांगलादेशात असताना आपला मृत्यू अवघ्या २०-२५ मिनिटांवर येऊन ठेपला होता. त्यामुळे आपण आणि धाकटी बहीण शेख रेहाना यांना गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी भारतात पळून यावे लागले होते, असे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आवामी लीग पक्षाचे सरकार पाडले गेल्यानंतरच्या घटनाक्रमाबद्दल फेसबुकवर अपलोड केलेल्या ऑडीओ मेसेजमध्ये त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. आपल्याला जिवंत ठेवल्याबद्दल त्यांनी अल्लाचे आभार देखील मानले आहेत.
हसीना यांच्यावर यापुर्वी दोन वेळा प्राणघातक हल्ले झाले होते. त्यावेळी आपण बचावल्याची आठवणही हसीना यांनी उद्धृत केली. आपल्या हातून काही दैवी काम व्हायचे होते, म्हणूनच अल्लाने आपल्याला वाचवले होते, असे त्यांनी म्हटले आहे.
आपल्या हत्येसाठी राजकीय विरोधकांनी कारस्थान केल्याचा आरोपही हसीना यांनी केला आहे. आपल्याला आपल्या देशाशिवाय रहावे लागते आहे. याचे खूप दुःख होते आहे. सर्वकाही जळून गेले आहे, असे दाटून आलेल्या कंठाने हसीना म्हणाल्या.
२१ ऑगस्ट २००४ रोजी देशाच्या विरोधी पक्ष नेत्या असताना एका रॅलीला संबोधित करत असताना हसीना यांच्यावर ग्रेनेड फेकला गेला होता. या बॉम्बस्फोटातत २४ जण ठार झाले होते. तर २००० साली पंतप्रधान असताना हसीना गोपालगंज जिल्ह्यातल्या सभेत भाषण करण्यापुर्वी पोलिसांना सभेच्या ठिकाणी टाईमबॉम्ब लावलेला आढळून आले होते.
हा ७६ किलोचा बॉम्ब मंचापासून ५० फूट अंतरावर होता. तर गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी गणोभाबन येथील अधिकृत निवासस्थानी जमाव येत असल्याचे सुरक्षा रक्षकांनी सांगितले. जीव वाचवण्यासाठी आणि सुरक्षितपणे निघून जाण्यासाठी अवघी ४५ मिनिटे आपल्या हातात असल्याचे रक्षकांनी सांगितल्यामुळेच आपण भारतात आल्याचेही हसीना म्हणाल्या. हसीना निघून गेल्यानंतर जमावाने त्यांच्या घराची आणि शेख मुजीबूर रेहमान यांच्या नावाच्या संग्रहालयाची तोडफोड केली आणि जाळपोळ केली होती.