शेफाली, स्मृतीची आक्रमक अर्धशतके

सेंट ल्युसिका: नवोदित शोफाली वर्मा आणि भरात असलेल्या स्मृती मानधना यांच्या तडाखेबंद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताच्या महिला क्रिकेट संघाने यजमान वेस्ट इंडिजचा 84 धावांनी पराभव केला व पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

प्रथम फलंदाजी करताना शोफालीच्या आक्रमक फलंदाजीला मानधनाने सुरेख साथ दिली. शोफालीने 49 चेंडूत 6 चौकार व 4 षटकार फटकावत 73 धावांची खेळी केली. मानधनाने 46 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. या जोडीने 143 धावांची सलामी देताना विक्रमी भागीदारी नोंदविली.

या दोघी बाद झाल्यावर कर्णधार हरमनप्रीत कौरने 21 व वेदा कृष्णमूर्तीने 15 धावा चोपल्याने संघाला 4 बाद 185 अशी मोठी धावसंख्या उभारता आली. या धावांचा पाठलाग करताना यष्टीरक्षक फलंदाज शेमेन कॅम्पबेलने केलेल्या 33 धावांव्यतरिक्त अन्य एकही फलंदाज खेळपट्टीवर भारतीय फिरकी गोलंदाजीसमोर टिकू शकला नाही.

भारताकडून राधा यादवने 10 धावांत 2, शिखा पांडेने 22 धावांत 2 तर पुनम यादवने 24 धावांत 2 गडी बाद करत वेस्ट इंडिजचा डाव 9 बाद 101 धावांवर रोखला व सहज विजय प्राप्त केला. टी-20 मालिकाही खिशात टाकण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.