मुंबई – शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक मॉर्फ केलेला आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संताप पसरला आहे. या प्रकरणी रविवारी रात्री उशीरा शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात आरोप करत तक्रार दाखल केली आहे. आपला हा खोटा व्हिडीओ ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनीच व्हायरल केल्याचा थेट आरोप त्यांनी केला असून, सध्या शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात चांगलाच वाद चालू झाला आहे.
या प्रकरणावरून विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला. महिला आमदारांनी या प्रकारावर संताप व्यक्त करत आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत काही जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, हे आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच आता ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे मोठा गोंधळ उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी त्या माध्यमांशी सवांद साधत होत्या.
प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, “त्या रॅलीचा व्हिडीओ प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांच्या अकाऊंटवर लाइव्ह होता. त्यांची बदनामी ही प्रकाश सुर्वेंच्या घरातूनच सुरू झाली. त्यामुळे अटक करायची होती तर त्यांना करायची होती. मुंबई पोलिसांनी दबावाखाली काम करू नये. अन्यथा मुंबई पोलिसांचा जो सन्मान आहे तो मातीत मिळेल. सायबरचं काम आहे तपासण्याचं ते करतील, असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या. दरम्यान, आता प्रियंका चतुर्वेदी यांच्या दाव्यामुळे नवा ट्विस्ट निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली आहे.