काटेवाडीत तुकोबांच्या पालखीला मेंढ्याचे गोल रिंगण

भवानीनगर – काटेवाडी (ता. बारामती) येथे श्री संत तुकाराम महाराज पालखी रथास मेंढ्यांनी गोल रिंगण घेत वंदन केले. यावेळी हजारो भाविकांनी हा क्षण आपल्या डोळ्यात टिपून घेतला. अतिशय उत्साहात हरी नामाच्या गजरात हे मेंढ्यांचे गोल रिंगण पार पडले. पोलिसांनी अतिशय शिस्तबद्ध नियोजन केल्याने यंदा गर्दी, ढकलाढकली झाली नाही.

काटेवाडी येथे श्री संत तुकाराम महाराजांची पालखी दुपारी 12 वाजता आली. पालखीचे स्वागत धोतराच्या पायघड्या घालून करण्यात आले. खांद्यावर घेत पालखी विसावा ओट्यावर आणण्यात आली. तीन तासांचा विसावा उरकून दुपारी 3:00 वाजता इंदापूर तालुक्‍याकडे भवानीनगर येथे पालखीने प्रस्थान ठेवले. काटेवाडी येथील बसस्थानकासमोर पालखीस मेंढ्यांचे गोल रिंगण पार पडले. यामध्ये हरी महारनवर, संभाजी काळे, जालिंदर महारनवर यांच्या मेंढ्यांनी हे गोल रिंगण पार पाडले. अतिशय मनोभलिनीय असे हे दृश्‍य उपस्थितांनी डोळे भरून पाहिले. पंचक्रोशीतील भाविकभक्त यावेळी जमा झाले होते. या वेळी भक्ती रसात संपूर्ण परिसर नाहून निघाला. बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनीही भाविकांबरोबर फुगडीचा ठेका धरला. हे रिंगण संपताच हरिनामाच्या गजरात पालखीने संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याने भवानीनगरकडे प्रस्थान केले.

Leave A Reply

Your email address will not be published.