क्रीडा विभागाचे दुर्लक्ष : कासारवाडीतील “ह’ क्षेत्रीय कार्यालयालगतचा प्रकार
पिंपरी – श्रीमंत पालिकेच्या मिळकतींची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याने मिळकतींवरील अतिक्रमण वाढत आहे. कासारवाडी येथे सुमारे दोन कोटी रुपये खर्चून येत असलेल्या क्रीडांगणाला चक्क जनावरांचा गोठा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या “ह’ क्षेत्रीय कार्यालयालगत हा प्रकार सुरू असताना प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कासारवाडी येथे “ह’ क्षेत्रीय कार्यालयालगत 59 गुंठ्यात हे क्रीडांगण आहे. दोन टप्प्यांमध्ये क्रीडांगण विकसित करण्यात येत आहे. त्यावर सुमारे दोन कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेने 65 लाख रुपये खर्चून मैदान व व्यासपीठ विकसित केले. वर्षभरापूर्वी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते मैदानाचे उद्घाटन झाले. जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा देखील याठिकाणी पार पडल्या. यानंतर दुसऱ्या टप्प्यात मैदान विकसित करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले.
दुसऱ्या टप्प्यात एक कोटी 30 लाख रुपये खर्चून दोन प्रेक्षक गॅलरी, कमान, खोल्या व इतर क्रीडा सुविधा विकसित करण्याचे काम सुरू आहे. गॅलरीचे काम अंतिम टप्प्यात असून दोन महिन्यात क्रीडांगण पुर्ण क्षमतेने विकसित होणे अपेक्षित आहे. मात्र, स्थानिकांनी याठिकाणी जनावरे बांधून क्रीडांगणाचा अक्षरशः गोठा केला आहे. चारा, शेण यामुळे विद्रुपीकरण झाले आहे.
महापालिकेच्या क्रीडांगणाची झालेली दुरावस्था खेदजनक आहे. याबाबत आपण स्वतः प्रशासनाकडे तक्रार केली. आयुक्तश्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा देखील केली. मात्र, अद्याप दखल घेतली गेली नाही. कासारवाडीकरांसाठी मैदानी खेळांसाठी हे एकमेव मोठे क्रीडांगण आहे. मात्र, त्याचा गोठा झाल्याचे चित्र आहे. आपल्या मिळकतींचे रक्षण करण्याची कुवत नसेल तर महापालिका प्रशासनाने करदात्यांचे कोट्यावधी रुपये खर्ची पाडू नयेत.
– आशा शेंडगे, स्थानिक नगरसेविका.महापालिकेच्या क्रीडांगणाची झालेली दुरावस्था खेदजनक आहे. याबाबत आपण स्वतः प्रशासनाकडे तक्रार केली. आयुक्तश्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा देखील केली. मात्र, अद्याप दखल घेतली गेली नाही. कासारवाडीकरांसाठी मैदानी खेळांसाठी हे एकमेव मोठे क्रीडांगण आहे. मात्र, त्याचा गोठा झाल्याचे चित्र आहे. आपल्या मिळकतींचे रक्षण करण्याची कुवत नसेल तर महापालिका प्रशासनाने करदात्यांचे कोट्यावधी रुपये खर्ची पाडू नयेत.
– आशा शेंडगे, स्थानिक नगरसेविका.
Real news