लाखणगांव- आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पोंदेवाडी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मेंढी ठार झाली. ही घटना रविवारी (दि. 23) रात्री 10 वाजता घडली. शेतकरी विठ्ठल राणुजी वाळुंज यांचे सुमारे 10 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पोंदेवाडी येथील शेतकरी विठ्ठल राणुजी वाळुंज यांचा बकऱ्यांचा वाडा रघुनाथ बबन वाळुंज यांच्या शेतात मुक्कामाला आहे.
मेंढ्याच्या संरक्षणासाठी वाघुरं लावून आतमध्य शेळ्या-मेंढ्या सुरक्षित असताना रात्री पाच फूट उंचीच्या वाघुरावरून उडी मारून बिबट्याने मेंढ्या उचलून नेण्याचा प्रयत्न केला; परंतु विठ्ठल वाळुंज यांची पत्नी शांताबाई वाळुंज, मुलगा सिद्धेश्वर यांनी आरडाओरडा केल्याने आणि कुत्री भुंकल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मेंढी गतप्राण झाली. घटनास्थळी वनविभागाचे वनपाल एस. एस. बैचे, वनरक्षक एस .एन. अनासुने यांनी पंचनामा केला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी खरेदी-विक्री संघाचे संचालक अनिल वाळुंज यांनी वनविभागाकडे केली आहे.