मुंबई – शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीची अखेर साडेसहा वर्षानंतर कारागृहातून सुटका झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर गुरुवारी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले. दोन लाखांच्या जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच किंमतीच्या हमीवर न्यायालयाने इंद्राणीची भायखळा जेलमधून सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत.
इंद्राणी मुखर्जीला तिची मुलगी शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी साल 2015 मध्ये अटक केली होती. तेव्हापासून इंद्राणी मुंबईतील भायखळा येथील महिला मध्यवर्ती कारागृहातच आहे. त्यादरम्यान इंद्राणीकडून असंख्यवेळा जामीनासाठी सत्र न्यायालयापासून हायकोर्टापर्यंत अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाने प्रत्येकवेळी तिचा अर्ज फेटाळून लावला होता.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानंतर विशेष न्यायालयानेही इंद्राणीला जामीन दिला असला तरीही कायदेशीर कागदपत्रांची पुर्तता न झाल्यामुळे इंद्राणीला गुरुवारची रात्रही कारागृहातच काढावी लागली. शुक्रवारी संध्याकाळी कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर इंद्राणीची साडेपाचच्या दरम्यान जेलमधून सुटका झाली आहे.