मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने आज शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी यांना अखेर पाच वर्षानंतर जामीन मंजूर केला. या प्रकरणातील शीना बोरा यांची आई इंद्राणी मुखर्जी तुरुंगात आहे.
मुंबई उच्च न्यायालयात आज पीटर मुखर्जीच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. मात्र हा आदेश सहा आठवडे प्रलंबित ठेवण्यात आला आहे. तोपर्यंत पीटर मुखर्जी यांना सहा आठवडे तुरुंगात काढावे लागणार आहे. सीबीआयला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून कोर्टाने हा आदेश दिला आहे.
या प्रकरणात शीना बोरा यांची आई इंद्राणी मुखर्जीला २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. पीटर मुखर्जी यांची चौकशी केल्यानंतर त्यांनाही या प्रकरणात अटक झाली होती. २०१२ साली शीना बोरा प्रकरण समोर आले होते.