नोटीस बजावल्यानंतर घटस्फोटाचा मार्ग मोकळा : समुपदेशन ठरले महत्त्वाचे
पुणे – परसपर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमारे वर्षभर सुनावणीसाठी ती हजरच होत नव्हती. दोघांनी मिळून अर्ज केल्यामुळे एकतर्फी आदेश देता येत नव्हता. अशा परिस्थितीत कंटाळून त्याने दावा काढून टाकण्यासाठी अर्ज केला. सर्व परिस्थिती पाहत न्यायालयाने न्यायालय, समुपदेशक आणि वकिलांमार्फत नोटीस बजावण्यास सांगितले. त्यानंतर ती हजर झाली. समुपदेशक आणि वकिलांनी केलेल्या समुपदेशानंतर पाच वर्षे वेगळे राहणाऱ्या दोघांचा घटस्फोटाचा अर्ज न्यायालयाने मंजुर केला. दोघांनी नव्याने आयुष्य जगण्यास सुरूवात केली.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघांनी वतीने ऍड. सुचित मुंदडा आणि ऍड. विशाल पडवळ यांनी कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला. दोघेही उच्चशिक्षित आहेत. तो पुण्याचा, तर ती नाशिकची आहे. दोघेही नोकरी करतात. घरच्यांच्या उपस्थितीत पाहणी करून दोघांना एकमेकांना पसंत केले.
डिसेंबर 2014 मध्ये नाशिक येथे दोघांचा विवाह झाला. जेमतेम एक वर्ष संसार केल्यानंतर दोघांचे पटेनासे झाले. नोव्हेंबर 2015 पासून दोघे वेगळे राहु लागले. ते नोव्हेंबर 2019 पर्यंत तशीच परिस्थिती होती. घरच्यांमध्येही चर्चा झाली नाही. त्यानंतर समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी मध्यस्थी केल्यानंतर परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार अॅड. सुचित मुंदडा आणि अॅड. विशाल पडवळ यांच्यामार्फत दावा दाखल करण्यात आला. परंतु, त्यानंतर काही कारणाने दोन्ही कुटुंबात पुन्हा वाद झाला. त्यामुळे ती न्यायालयात हजर राहत नव्हती. परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दावा दाखल केल्याने एकतर्फी आदेश करणे शक्य नव्हते. त्यामुळे काढून टाकण्यासाठी मुलातर्फे अर्ज करण्यात आला. त्यावेळी गणात्रा न्यायालयाने नोटीस बजावण्यास सांगितले होते.