पुणेः लोणावळा येथे दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घरात खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीचे अपरहण करण्याचा डाव आरोपीने केला होता. मात्र, ही चिमुकली रडायला लागली अन् आरोपीने आखलेला अपहरणाचा डाव फसला. ही घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या व्यक्तीला पकडून घरातल्या व्यक्तींनी चोप दिला. अमर त्रिपाठी असे पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चिमुकली राहत असलेल्या घरात आरोपी शिरला आणि मुलीला घेऊन जाणार तितक्यात मुलीने मोठ मोठ्याने रडायला सुरूवात केली. मुलगी का रडत आहे? हे पाहण्यासाठी तिची आई बाहेर आली. त्यावेळी तिला घेऊन पसार होण्याच्या तयारीत तो होता. मात्र, घरातील व्यक्तींनी त्याला पकडले आणि चांगलाच चोप दिला. या प्रकरणी लोणावळा पोलिसांनी आरोपी अमर त्रिपाठी याला अटक केली आहे. या घटनेवर पालकांनी लहान मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. सुदैवाने सदर घटनेत अपहरणाची घटना टळली आहे.