पुणे – एका महिलेने चांगल्या पॅकेजची नोकरी मिळवण्यासाठी नोकरी विषयक वेबसाईटला तब्बल बारा लाख रुपये हस्तांतरीत केले. मात्र मात्र बारा लाख घेतल्यानंतर त्यातील फक्त 3 लाख 39 हजार रुपये परत करुन तीची 8 लाख 60 हजाराची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पाच अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी 43 वर्षीय महिला मगरपट्टा सिटी येथे रहाते. ती एका आयटी कंपनीमध्ये काम करते. तीने नोकरी बदलण्यासाठी एका नोकरीविषयक ऑनलाईन वेबसाईटवर माहिती भरली होती. त्यानूसार तीला संबंधीत वेबसाईटवरुन काही प्रतिनिधींनी फोन केले. त्यांनी चांगल्या पॅकेजची नोकरी देण्याचे आमिष दाखवून प्रोसेसिंग शुल्क म्हणून 11 लाख 99 हजार रुपये वेबसाईटच्या लिंकवर ट्रांन्सफर करण्यास भाग पाडले.
यानंतर त्यापैकी 3 लाख 39 हजार रुपये परत दिले. मात्र उर्वरीत 8 लाख 60 हजार रुपये परत न देता तसेच नोकरी न देता फसवणूक केली. संबंधीत महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावरुन हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक हमराज कुंभार करत आहेत.