हैदराबाद – कोविड-19 ची महामारी देशभर असल्याने अनेकांना वेगवेगळी उपक्रम राबवायला वेळ आणि संधी मिळाल्याचे दिसून येत आहे. अशातच हैदराबाद येथील कायदा शाखेची विद्यार्थिनी असलेल्या रमागिरी स्वारिकाने मायक्रो आर्टच्या माध्यमातून एक नवाच विक्रम केला आहे.
रमागिरीने तांदळाच्या दाण्यांवर सुप्रसिद्ध भारतीय धार्मिक ग्रंथ भगवदगीता कोरला आहे. गीतेचे 18 च्या 18 अध्याय तांदळावर कोरण्यासाठी तिला 4042 तांदूळ लागले, तर या उपक्रमासाठी तिचे सर्वसाधारणपणे 150 तास खर्च झाले. त्यामुळे रमागिरीच्या या अनोख्या मायक्रो आर्टची प्रशंसा समाज माध्यमांत होताना दिसत आहे.
या अनोख्या विक्रमाविषयी बोलताना रमागिरीने सांगितले की, मी नाझ्या या कलाकृतीसाठी भिंगाचा वापर करीत नाही. माझ्या अगदी अलीकडील कामात मी 4042 तांदळांवर भगवद्गगीता लिहिली असून त्यासाठी मला 150 तास लागले.
अशाच वेगवेगळ्या कलाकृती साकारण्यासाठी मी दुधाचाही वापर करते. तर कागदावर कोरीव काम आणि तीळांवरही विविध कलाकृती साकारते. अशा प्रकारच्या आजवर विविध माध्यमांतल्या मी 2000 पेक्षा जास्त कलाकृती साकारल्या आहेत.
भारतीय राज्यघटनेचे प्रास्तविक (प्रिऍम्बल) रमागिरीने मानवी केसांवर लिहून काढले होते. तिच्या या कलाकृतीचा गौरव तेलंगणचे राज्यपाल तामिळसाई सुंदरराजन यांच्या हस्ते करण्यात आला होता. 26 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कायदा दिन साजरा करण्यासाठी रमागिरीने मागील वर्षी केसांवर घटनेची प्रस्तावना लिहिलेली होती. तिने सर्वप्रथम केसांचे बारीक तुकडे एकत्र केले आणि नंतर त्यांना एकत्रित पेस्ट केले ज्यानंतर तिने भारतीय घटनेचे शब्द लिहिण्यासाठी पातळ ब्रश आणि पांढरा रंग वापरला होता.
रमागिरीला वर्ष 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑर्डर बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित करण्यात आले आणि वर्ष 2019 मध्ये तिला उत्तर दिल्ली सांस्कृतिक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मला न्यायाधीश व्हायचे असून देशभरातील महिलांना काही सकारात्मक प्रेरणा मिळेल, असे कार्य करायचे आहे. मला नेहमीच कला आणि संगीतात रस होता आणि लहानपणापासूनच मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. गेल्या काही वर्षांत सूक्ष्म कला ही संकल्पना खूप लोकप्रिय झाली आहे. त्यामध्येही मला माझा ठसा उमटवायचा आहे, असे रमागिरी आवर्जून सांगते.