ती आणि चाळीशी…

चाळीशीकडे वाटचाल करणारी कोणतीही स्त्री ही वय वर्ष 16 असणाऱ्या मुली इतकीच अल्लड, सुंदर दिसते. नाही विश्‍वास बसत ना? पण आहे खरं हे!

विशीतली धडपड आणि तिशीतली गडबड संपून चाळीशीमध्ये जेव्हा एखादी स्त्री प्रवेश करते तेव्हा ती पूर्णपणे सुख, समाधान आणि शांती ह्या दागिन्यांनी नटलेली असते. ती अनुभव, काही त्रास, थोडी दुःखं यातून तावून-सुलाखून सोन्यासारखी चमकत असते. लग्न, नोकरी आणि मुलं ह्यामधुन जरा स्वतःसाठी वेळ काढू लागलेली असते. थोडीफार या जबाबदाऱ्यातून ती स्वतःचे छंद जोपासू लागते. नवऱ्यासाठी थोडा वेळ काढून दोघांमध्ये छान संवाद साधला जातो, तो याच वयात. प्रवास, किंवा इतर सामाजिक कार्यक्रम ह्यात किंवा नवीन समविचारी मित्र मैत्रिणी जोडून त्यांच्यासह धमाल करणे ह्यात तिला रमायला आवडतं. याच वयात तिला खरं तर घरच्यांनीसुद्धा समजून घ्यायला हवं असतं, कारण तिच्यात होणारे हर्मोन्सचे बदल, ज्यामुळे तिची चिडचिड होणे, साध्यासाध्या गोष्टीसाठी राग येणे हे घडू शकते, जे अगदी नैसर्गिक असते.

आदर्श संसार करताना ती स्वतःला मुलं नवरा, नातेवाईक ह्यात झोकून देते आणि जगणंच विसरलेली असते. तिचं स्वतःसाठी जगणं राहून गेलेलं असतंच कारण ती दुसऱ्यासाठी जगत असते. तिला ह्याच वयात तिला समजून घेणारा एक सखा, एक मित्र हवा असतो जो नवऱ्या व्यतिरिक्त दुसरा पुरुषसुद्धा असू शकतो आणि असायलाही काही हरकत नाही.
कुठल्याही नात्यात नवरा बायकोने एकमेकांना स्पेस ही द्यायला हवीच आणि एकमेकांच्या मताचा आदरही ठेवायला हवा. अर्थात ही मोकळीक म्हणजे स्वैराचार नव्हे हे ही तितकेच खरे आहे. प्रत्येक नवरा बायकोने आपल्या नात्यातील मापदंड हा स्वतःच ठरवायचा असतो. किती अनिर्बंध वागायचे याच्या सीमा आखून घ्यायला हव्यात; तरच नात्यात ओलावा टिकून राहू शकतो.

ती एखाद्या मुक्त विहार करणाऱ्या पक्ष्यासारखी स्वतःला समजत असते. ती स्वतःला जपू लागते, सुंदर दिसण्यासाठीचे प्रयत्न करू लागते, आणि सुंदर दिसतेही. एखादी केसांमध्ये दिसणारी मेंदी लावल्यामुळे उठून दिसणारी बट तिच्या प्रगल्भ चेहऱ्याला शोभून दिसते. डोळ्यांवरचा चष्मा तिच्या सौंदर्यात भरच टाकतो.

ह्याच वयात सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेल्या स्त्रियांचे वजनही झपाट्याने वाढायची शक्‍यता असते, त्यामुळे त्यांनी ह्या वयात आपल्या आहार विहार ह्याची नीट काळजी घेणे गरजेचे असते. आणि आनंद आहे की, आजकालच्या स्त्रिया “हेल्थ कॉन्शस’ झाल्यामुळे त्या आधीच जिम जॉईन करतात, सकाळी जिमला जातात, योगा करतात. सकस आणि संतुलित आहार, जसे फळे, ड्रायफ्रुट्‌स ह्याचा आहारात समावेश करतात. हे सगळे केल्यामुळे त्या विशीतील तरुणीप्रमाणे फिट राहू शकतात आणि ह्या सगळ्याचा परिणाम त्यांच्यातल्या आत्मविश्‍वासात वाढ होते.

संसारात स्थिरस्थावर झाल्यामुळे समाजात मिसळतात, जास्त सोशल मीडियाचा वापर करतात म्हणून अनेक मित्र मैत्रिणी तिला इथे भेटतात. चाळीशीतील स्त्री ही विशीतील स्त्रीपेक्षा जास्त अपडेट असते. आत्मविश्‍वासाने त्या कोणत्याही विषयावर आपली मते मांडू शकतात. कधीकधी याच वयात तिला कोणाबद्दल ओढ आकर्षणही वाटू शकते, कोणीतरी आवडायला लागू शकते. उत्तम संसार, चांगला नवरा, उच्च शिक्षण घेत असलेली मुलं असूनही, तिला कोणाचीतरी ओढ वाटणं, हे चूक का बरोबर ते तिला कळत नसतं; पण तिला सगळं हवंहवंसं वाटू लागतं. एखादा मित्र तिला भेटतोही या वळणावर; जो तिच्या या मानसिक अवस्थेला समजून घेऊन तिचा खूप चांगला मित्र बनतो. प्रत्येक गोष्ट शारीरिक पातळीवर मोजमाप करणाऱ्या ह्या समाजाला ही मैत्री मान्य नसते, पण तिच्या नवऱ्याचा जर तिच्यावर विश्‍वास असेल तर ती ही मैत्री स्वीकारते. आणि एक चाळीशी यशस्वी होते नवऱ्याच्या सोबतीने, साथीने.

जी स्त्री संसाराचा पाया आहे, तिच्या आयुष्यात येणारे हे सुंदर वळण जर सुशोभित असेल तर जीवनातील पुढील रस्ता ती आनंदाने चालत जाऊन तिचे ध्येय गाठू शकते. फक्त हे वळण तिला स्वतःला समजायला हवे, जे खरेच सुंदर असते. आपल्या माणसांची सोबत आणि आत्मविश्‍वास ह्यावर ती काहीही करू शकते मग ती विशीतील तरुणी असो वा चाळीशीतील सुंदर स्त्री. हो, चाळीशीतील सुंदर स्त्री!

– मानसी चापेकर

Leave A Reply

Your email address will not be published.