मुंबई -अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी आता सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) रिया चक्रवर्तीसह अनेक संशयितांची चौकशी होत आहे. यात रियाचा भाऊ शौविक याची ईडीने तब्बल 18 तास चौकशी केली आहे. शौविकसह सुशांतने दोन कंपन्या स्थापन केल्या होत्या. या कंपन्यांमध्ये दोघेही संचालकपदावर कार्यरत होते.
ईडी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रियाची चौकशी केली होती. त्यानंतर शौविकलाही शनिवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सुशांतच्या चार बॅंक खात्यातील व्यवहारांचाही तपास केला गेला आहे. सुशांतने कुटुंबीयांच्या नावाने केलेल्या एफडीची खातीही तपासण्यात आली आहेत. शौविक व सुशांत संचालक असलेल्या कंपन्यांची माहिती, त्यातील गुंतवणूक व एकूण व्यवहारही तपासले जात आहेत. यासाठी रिया, शौविक व तिचे कुटुंबीय सध्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत.
सुशांतसोबत वांद्रे येथील निवासस्थानी वास्तव्य करणाऱ्या सिद्धार्थ पिठानी यालाही ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. तसेच सुशांतची माजी व्यवस्थापक श्रुती मोदीलाही चौकशीसाठी समन्स बजावले आहे. तसेच रियाला उद्या (सोमवार) पुन्हा एकदा ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी रिया, शौविक तसेच त्यांच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
सुशांतसिंहच्या बॅंक खात्यातून हेराफेरी
सुशांतच्या बॅंक खात्यातून त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीने सीएच्या मदतीने चक्क 2 कोटी 65 लाख रुपयांची रक्कम घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. सुशांतचे अकाउंट पाहत असलेल्या दोन सीएच्या बॅंक खात्यात मार्च महिन्यात काही कोटींची रक्कम जमा झाल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. याबाबतचा खुलासा रियानेच ईडीच्या चौकशीत केला आहे. सुशांतने त्याच्या मोठ्या बहिणीच्या नावे साडेचार कोटी रुपयांची एफडी केली होती. मात्र, सुशांतने रियासाठी त्यातील सुमारे अडीच कोटी रुपये काढले व त्यानंतर एफडीची रक्कम केवळ 2 कोटी इतकीच उरली आहे.