नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सोमवारी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. ते शपथ घेणारे अखेरचे नवनिर्वाचित खासदार ठरले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सिन्हा तृणमूल कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून विजयी झाले. लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेणारे सिन्हा ५४२ वे खासदार ठरले. लोकसभेचे एकूण संख्याबळ ५४३ इतके आहे.
मात्र, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एका जागेचा राजीनामा दिल्याने सध्या १ जागा रिक्त आहे. राहुल यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तरप्रदेशातील रायबरेली अशा २ जागांवरून लोकसभा निवडणूक लढवली. दोन्ही जागांवर त्यांनी विजय मिळवला.
नियमांनुसार १ जागा सोडावी लागणार असल्याने त्यांनी वायनाडच्या जागेचा राजीनामा दिला. ती रिक्त जागा भरण्यासाठी पोटनिवडणूक घ्यावी लागेल. ती पोटनिवडणूक कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी लढवणार असल्याचे पक्षाने याआधीच जाहीर केले आहे. पोटनिवडणुकीत विजयी झाल्यास राहुल यांच्या भगिनी प्रियंका प्रथमच खासदार म्हणून संसदेत प्रवेश करतील.