शास्त्रीजींनी घालून दिला आदर्श

पूर्वीच्या काळच्या राजकारणामध्ये आणि आताच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठा फरक निर्माण झाला आहे याचे कारण गेल्या काही वर्षात राजकारण्यांची मानसिकता बदलली आहे. पूर्वीच्या राजकारणांची असंख्य अशी उदाहरणे आहेत ज्यामध्ये निस्पृहता, निकोप स्पर्धेची मानसिकता, निस्वार्थीपणा, प्रामाणिकपणा आढळतो. लालबहाद्दर शास्त्री हे तर आजच्या समस्त राजकारण्यांसाठी सर्वांत मोठे आदर्श आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासातील अनेक उदाहरणांचे दाखले विश्‍लेषक, अभ्यासक देत असतात. असाच एक किस्सा आहे 1962 च्या निवडणुकांच्या वेळीचा.

1957 मध्ये अलाहबाद लोकसभा मतदारसंघातून लालबहादूर शास्त्री विजयी झाल्यानंतर 1962 मध्ये पुन्हा एकदा ते रिंगणात उतरले होते. निवडणुकांसाठीच्या प्रचाराचे केवळ दोन दिवस उरले होते आणि बहुतांश मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शास्त्रीजी दिवसरात्र सभा घेत फिरत होते.

अशीच एक सभा घेऊन परतत असताना त्यांच्याविरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराची जीप रस्त्यामध्ये बंद पडलेली शास्त्रीजींना दिसली. तेथे या उमेदवारांचे समर्थक चर्चा करत होते. त्यांच्या मते, जोपर्यंत मेकॅनिक येत नाही तोपर्यंत ही गाडी दुरुस्त होणार नाही आणि तो येऊन गाडी दुरुस्त करेपर्यंत बराच वेळ जाईल व तोपर्यंत त्या उमेदवाराला सभास्थळी पोहोचायला बराच उशीर होईल. परिणामी, तेथे सभेसाठी जमलेले लोक निघूनही जातील. त्यावेळी आजच्याप्रमाणे वाहनांची भाऊगर्दी नव्हती. मात्र, त्याचबरोबर आजच्या इतकी राजकारण्यांमध्ये परस्पर कटुता, सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची मनोवृत्तीही नव्हती. त्यामुळेच लालबहादूर शास्त्रींनी आपली जीप तेथे थांबवली आणि घामाघूम झालेल्या आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराजवळ जात त्याला प्रणाम करत “मी काही मदत करू शकतो का’ असे विचारले. शास्त्रीजींचे हे उद्‌गार ऐकून उमेदवाराच्या तोंडून शब्दच फुटेनात. यावर शास्त्रीजीच पुढे म्हणाले की, तुम्हाला जेथे पोहोचायचे आहे मीही त्याच दिशेने चाललो आहे. माझीही तिथेच सभा आहे. आपण दोघेही जाऊ आणि क्रमाक्रमाने भाषण करू. त्यानंतर मतदार कोणाला मत द्यायचे हे ठरवतील.’ मात्र तरीही तो उमेदवार तयार होईना. अखेर तेथून जाणाऱ्या दुसऱ्या एका जीपमध्ये बसून शास्त्रीजी स्वतः निघून जाण्यास निघाले आणि आपली जीप त्या उमेदवाराला दिली. याला काहींनी विरोध केला असता शास्त्रीजी म्हणाले की, माझा विरोधक जर मतदारांसमोर आपले मुद्दे मांडण्यासाठी पोहोचलाच नाही तर सामना बरोबरीचा होणार नाही. म्हणूनच त्यांना ही जीप घेऊन जाऊ दे. मी माझी व्यवस्था केली आहे.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.