निवडणूक चिन्हाबाबत शशिकला यांना दणका

“दोन पाने’ पलानीस्वामींच्या गटाला

नवी दिल्ली – “अद्रमुक’ पक्षाचे नाव आणि “दोन पाने’ या निवडणूक चिन्हाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने टीटीव्ही.दिनाकरन आणि व्ही.के. शशिकला यांना दणका दिला आहे. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई.के.पलानीस्वामी यांच्या गटाला दिले जावे, या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला न्यायालयाने वैध ठरवले आहे.
निवडणूक आयोगाने 23 नोव्हेंबर 2017 रोजी चिन्ह आणि पक्षाचे अधिकृत नाव पलानीस्वामी यांच्या गटाला दिले होते. शशिकला आणि दिनाकरन यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र त्यांच्या या आक्षेपाला काहीही आधार नसल्याचे सांगून उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

शशिकला आणि दिनाकरन यांच्यावतीने ऍड. अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी मिळालेल्या अवधीत “प्रेशर कुकर’ हे निवडणूक चिन्ह अन्य कोणालाही दिले जाऊ नये, अशी मागणी केली. त्याप्रमाणे पुढील 15 दिवसात “प्रेशर कुकर’ हे चिन्ह अन्य कोणत्याही पक्षाला दिले न देण्याची तयारी निवडणूक आयोगाने दर्शवली.
जयललिता यांच्या निधनानंतर दिनाकरन यांनी “अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम’ नावाने नवीन पक्षाची स्थापना केली होती. दिनकरन आणि शशिकला यांची पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील गटाने अद्रमुकमधून हकालपट्टी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.