शशिकांत शिंदे यांची दमदार इनिंग पुन्हा सुरू

संतोष पवार
कुडाळ पोटनिवडणूक; दीपक पवार यांच्या बाजीमुळे आ. शिवेंद्रराजेंसाठी धोक्‍याची घंटा

सातारा – जिल्हा परिषदेच्या कुडाळ गटातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दीपक पवारांनी मोठ्या मताधिक्‍क्‍याने विजय मिळवत आपला गड राखला. ही निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार शशिकांत शिंदे आणि भाजपचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीतील आपल्या पराभवाचा हिशोब चुकता करून पुन्हा दमदार वाटचाल सुरू केली आहे. भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार मालोजी शिंदे यांचा पराभव आ. शिवेंद्रराजे यांच्यासाठी धोक्‍याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.

कुडाळ जिल्हा परिषद गटातून भाजपमधून 2017 च्या निवडणुकीत दीपक पवार यांनी शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांचा पराभव केला होता. दीपक पवार यांनी आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्याविरोधात भाजपकडून 2014 ची विधानसभा निवडणूक लढवून सुमारे 54 हजार मते मिळवली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र उमेदवार तेच मात्र पक्षांची अदलाबदल झाली. शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला तर दीपक पवार यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

विधानसभा निवडणुकीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व दीपक पवार यांच्यात लढत होऊन दीपक पवारांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर काही कालावधीत पुन्हा जिल्हा परिषदेची निवडणूक लागल्याने अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीकडून दीपक पवार रिंगणात उतरले. पवारांना शह देण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यूहरचना आखत पवारांच्या विरोधात त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे सौरभ शिंदे यांना उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या आदेशानंतर सौरभ शिंदे यांनी माघार घेतली. कुडाळ येथील मालोजी शिंदे या अपक्ष उमेदवाराला आ. शिवेंद्रसिंहराजेंनी पाठिंबा दिल्याने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.

दीपक पवार आणि मालोजी शिंदे यांच्यात कॉंटे की टक्कर होणार अशी परिस्थिती मतदारसंघात दिसत होती. मात्र, प्रत्यक्षात ही लढत शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात झाली. दीपक पवारांना विजयी करुन अनेकांचे हिशोब चुकते करणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी जाहीर सभेत सांगितले होते. यापुढे जावळी तालुक्‍यातही आपण लक्ष घालणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. पोटनिवडणुकीत सरासरी 44 टक्के मतदान झाले. कमी मतदान झाल्याचा फटका कोणाला बसणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

दीपक पवार यांनी पाच हजार 488 मतांनी मालोजी शिंदे यांचा पराभव करत आपला गड कायम राखला. या निवडणुकीत दीपक पवार विजयी झाले असले तरी खऱ्या अर्थाने हा विजय शशिकांत शिंदे यांचाच मानला जातो. शिंदे यांनी गेल्या काही वर्षात जावळी तालुक्‍यात लक्ष घातले नव्हते. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यामुळे शशिकांत शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे शशिकांत शिंदे यांनी कुडाळची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करत या निवडणुकीत व्यक्तीश: लक्ष घातले होते. या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शशिकांत शिंदे यांनी तालुक्‍याच्या राजकारणात शिरकाव केला आहे.

दीपक पवारांना मिळणार “झेडपी’चे उपाध्यक्षपद?
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने सातारा- जावळी मतदारसंघात राष्ट्रवादीला खमके नेतृत्व शोधण्यात अडचणी होत्या. मात्र, दीपक पवार यांच्या रूपाने चांगले नेतृत्व राष्ट्रवादीला आयते मिळाले. राष्ट्रवादीने पवार यांना शिवेंद्रराजेंच्या विरोधात विधानसभेला उतरवले. मात्र या निवडणुकीत शिवेंद्रराजे यांनी बाजी मारली. आता दीपक पवार यांचे काय होणार, सातारा – जावळीत राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार, याची उत्सुकता होती. राष्ट्रवादीने मात्र दीपक पवार यांना जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत पुन्हा उतरवून त्यांना ताकद देण्याचा निर्णय घेतला. आता दीपक पवार यांना ताकद देऊन राष्ट्रवादी त्यांच्याकडे सातारा- जावळीची जबाबदारी देण्याचे संकेत आहेत. त्यानुसार काही दिवसांत होणाऱ्या जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत पवारांना उपाध्यक्षपद दिले जाण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.