शशिकांत शिंदे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा?
सातारा – माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा जाण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या पक्षनिष्ठेचे फळ देवून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार त्यांचा सन्मान करणार असल्याची चर्चा राज्यात आहे.
दरम्यान, शशिकांत शिंदे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद येणार असल्याच्या चर्चेने सातारा जिल्हा राष्ट्रवादीत नवचैतन्य निर्माण झाले आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर सर्वच पक्षांच्या संघटनात्मक रचनेत बदल होत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने त्यांच्या जागी खा. शरद पवार कोणाला संधी देतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
या स्पर्धेत धनंजय मुंडे आणि शशिकांत शिंदे यांची नावे आघाडीवर होती. मात्र, आता शशिकांत शिंदे यांच्या निवडीला शरद पवारांनी ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या वर्तुळात आहे. शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापनेपासून पक्ष वाढीसाठी काम केले आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग दोन पंचवार्षिक ते विजयी झाले होते. 2014 पूर्वीच्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवले होते. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. गेल्या पाच वर्षात राज्यात भाजपची सत्ता असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठी गळती लागली होती. उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजप प्रवेश केला होता. त्यामुळे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला धोका निर्माण झाला होता.
पक्ष अडचणीत असताना शशिकांत शिंदे यांनी शरद पवार यांची साथ न सोडता विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात उल्लेखनीय काम केले होते. मात्र स्वत: शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पराभवानंतरच शिंदे यांनी खचून न जाता पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे करणार असल्याचे स्पष्ट केले होते.
राष्ट्रवादीने शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली होती. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. राज्यातील सत्ता समीकरण जुळवताना आमदारांची पळवापळवी होऊ नये, यासाठीही शशिकांत शिंदे यांनी जोरदार प्रयत्न केले. पक्षाशी एकनिष्ठ राहून शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून शिंदे यांची ओळख आहे. त्यामुळे आगामी काळात शिंदे यांच्यावर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.




