सोनगाव ग्रामपंचायतीवर शशिकांत शिंदे गटाचे वर्चस्व

वीस वर्षांनतर सत्तांतर : जयदीप शिंदेंच्या गटाला मोठा धक्का 

कुडाळ – जावळी तालुक्‍यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या सोनगाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मयूर देशमुख यांच्या परिवर्तन पॅनेलने आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे कट्टर समर्थक व बाजार समितीचे माजी उपसभापती जयदीप शिंदे यांच्या ग्रामविकास पॅनेलवर सरंपचपदासह सहा जागांवर दणदणीत विजय मिळवल्याने आमदार भोसले यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे.

निवडणुक जरी ग्रामपंचायतीची असली तरी विधानसभेपुर्वीची ही रंगीत तालिम समजून आमदार शिंदे गट व आमदार भोसले गट या राष्ट्रवादीतीलच दोन अंतर्गत गटात ही लढत झाल्याने जावळी तालुक्‍यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. किंबहुना या निवडणुकीची चर्चा संपुर्ण जिल्ह्यात रंगली होती. निवडणुकीच्या प्रचारात प्रत्यक्षात जरी दोन्ही आमदारांचा सहभाग नसला तरी कार्यकर्त्यांच्यात सूरू झालेल्या घमासानीमुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर पक्षांतर्गत धुसफुस चव्हाट्यावर आली होती. त्यामुळेच नेत्यांचीही प्रतिष्ठा यानिमित्ताने पणाला लागली होती.

निवडणुक जाहिर झाल्यापासूनच अंत्यत चुरशीची व चर्चेची ठरलेली ही निवडणुक तालुक्‍यातील आगामी राजकीय घडामोडी ठरवणार हे माहीत असल्याने दोन्ही गटांकडून या निवडणुकीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आज झालेल्या मतमोजणीत मयूर देशमुख यांच्या गटाकडून सरपंचपदी शशिकला किर्वे (759) तर सदस्य म्हणून राजाराम मोरे (293), रेखा पवार (273), निलम शिंदे (278), अमोल रोकडे(249), योगिता चिकणे (242) या सहा उमेदवांनी विजय मिळवला तर जयदिप शिंदे यांच्या गटातून जितेंद्र चिकणे (294), सत्यवती दुदुस्कर (277), तेजश्री शिंदे(295), दीपक पवार(223) आदी चार उमेदवार विजयी झाले.

विजयानंतर सोनगाव येथे जाऊन माजी शिक्षण सभापती व भाजपचे नेते अमित कदम यांनी मयूर देशमुख यांचे अभिनंदन केले. मात्र त्यांच्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला उधाण आले. नवनिर्वाचित सरपंच शशिकला किर्वे बोलताना म्हणाल्या, गेल्या वीस वर्षापासून विरोधकांकडे सत्ता होती मात्र गावातील विकासाबाबात उदासीनता असल्यामूळेच आज जनतेने परिवर्तन घडवून आणले. पॅनेलप्रमुख मयुर देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून विकासकामांना गती मिळावी म्हणूनच जनतेने सत्तांतर केले. मी आणि माझे सदस्य गावच्या विकासासाठी कायम तत्पर राहू असेही त्यांनी सांगितले. विजयानंतर विजयी उमेदवारांनी गुलालाच्या उधळणीत फटाकांच्या आतषबाजीत आमदार शशिकांत शिंदेचा विजय असो अशा घोषणा देत संपूर्ण गावातून विजयी मारवणुक काढली.

यावेळी बोलताना मयूर देशमुख म्हणाले, जनतेने विरोधकांना त्यांची योग्य जागा दाखवली असून हा विजय कोणत्याही नेत्यांचा नसून राष्ट्रवादी पक्षाचा आहे. विरोधकांनी सेना, भाजप पक्षाशी हाथमिळवणी केली होती त्यामूळेच त्यांचा पराभव झाला. वीस वर्षांनतर सत्तांतर झाले आहे त्यामूळे जनतेच्या विश्‍वासास तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली.तर विरोधी जयदिप शिंदे म्हणाले, सोनगावची निवडणुक जिल्हात गाजल्याने विरोधकांनी या निवडणुकीत पैशाचा बेसुमार वापर करित दबावतंत्रही वापरले त्यामूळे ही निवडणुक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच ठरल्याने आमच्या गटाचा निसटता पराभव झाला, मात्र जनतेचा कौल आम्हाला मान्य असून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भविष्यातही विकासाची घोडदौड सुरूच ठेवणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.