Shashikant Shinde – नीट परीक्षेतील घोटाळ्यामुळे परीक्षांवरील विश्वास उडत आहे. सामान्यांच्या मुलांवर हा एकप्रकारे अन्याय असून धनदांडग्यांची मुलेच पुढे येणार आहेत. शासनाने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. यामध्ये काही कोचिंग क्लासेसची नावे आलेली आहेत. संबंधित मंत्र्यांना या प्रकाराला जबाबदार धरुन त्यांचा राजीनामा सरकारने घ्यावा. नीट परीक्षेनंतर एमपीएससी, युपीएससी परीक्षांबाबतही चर्चा होत आहेत. ही बाब गंभीर असून असे प्रकार घडू नयेत यासाठी केंद्र व राज्य सरकारने लक्ष देणे अपेक्षित आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दिल्लीमधून पेपर निघत असल्याने पेपर फुटीचा विषय दिल्लीमधूनही होऊ शकतो. वर्षानुवर्षे परीक्षेचा अभ्यास करुन असे प्रकार होणार असतील तर विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय आहे, असे त्यांनी नमूद केले. बेरोजगारांसाठी आता औद्योगिक क्षेत्रांमध्ये मोर्च काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढत आहे. युवा पिढी रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना तसे प्रयत्न होत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस त्या त्या जिल्ह्यातल्या बेरोजगार तरुणांसाठी औद्योगिक क्षेत्रांमध्ये मोर्चे काढणार आहे. स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्यावे ही आमची ठाम भूमिका आहे. बेरोजगारीच्या प्रश्नांवर एकजूट महत्वाची असून आजच्या पिढीला रोजगार मिळाला नाही तर अतिशय भयानक परिस्थिती आगामी काळात दिसेल अशी भीती शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली. सातारा – सांगली विधान परिषदेचा निकाल वेगळा असेल असा दावा करताना श्री. शिंदे म्हणाले, ‘‘विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळची परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती वेगळी असल्याने दि. २७ मे रोजी राज्यातील मतदारसंघनिहाय आकडेवारी समोर ठेवून कोणाला कुठे संधी द्यायची याबाबत एकत्र बसून निर्णय होईल. सातारा- सांगली मतदारसंघात बाळासाहेब पाटील व माझ्या नावाची चर्चा आहे.’’ जिल्हा परिषदेत आम्हाला बहुमत असताना शिंदे शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला डावलण्यात आले. त्यामुळे सातारा- सांगली विधान परिषद निवडणुकीतही महायुतीत त्यांना डावलले तर आम्ही एकत्र येण्याबाबत विचार करु, असेही शशिकांत शिंदे यांनी सांगितले.