Shashi Tharoor: केरळ विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेदांची नवी ठिणगी पडल्याचे चित्र आहे. सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या पक्षनेत्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीला ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर अनुपस्थित राहिल्याने, पक्षात पुन्हा एकदा ‘नाराजी नाट्य’ सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. बजेट सत्राची रणनीती आणि थरूर यांची अनुपस्थिती – संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी रणनीती आखण्याकरिता सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, पी. चिदंबरम, मनीष तिवारी आणि प्रमोद तिवारी यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते. सामान्यतः अशा धोरणात्मक बैठकांमध्ये शशी थरूर यांची भूमिका महत्त्वाची असते; मात्र त्यांच्या अनुपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कार्यालयाकडून स्पष्टीकरण, पण शंका कायम – थरूर यांच्या अनुपस्थितीवर सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जाऊ लागल्यानंतर त्यांच्या कार्यालयाने स्पष्टीकरण जारी केले आहे. “शशी थरूर सध्या देशाबाहेर असून त्यांनी आपल्या अनुपस्थितीबाबत पक्षाला आधीच कळवले होते. काही अपरिहार्य कारणांमुळे ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत,” असे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. नाराजीची नेमकी कारणे काय? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शशी थरूर यांची ही नाराजी जुनी आहे. त्यामागे काही प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. राहुल गांधींकडून दुर्लक्ष: नुकत्याच कोची येथे झालेल्या एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी थरूर यांना अपेक्षित सन्मान दिला नसल्याची चर्चा आहे. केरळमधील स्थानिक राजकारण: केरळमधील काँग्रेसचे काही स्थानिक नेते थरूर यांना जाणीवपूर्वक बाजूला सारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. सातत्यपूर्ण अनुपस्थिती: यापूर्वी २३ जानेवारी रोजी केरळ निवडणुकीच्या तयारीसाठी झालेल्या बैठकीलाही थरूर अनुपस्थित होते. लागोपाठच्या दोन मोठ्या बैठकांना दांडी मारल्याने ही केवळ ‘वेळेची कमतरता’ नसून ‘नाराजी’ असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीपूर्वी पेच वाढणार? केरळमध्ये सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस पूर्ण जोर लावत असताना, शशी थरूर यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नेत्याची नाराजी पक्षाला महाग पडू शकते. हेही वाचा – Todays TOP 10 News: मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय, लाडक्या बहिणींना दिलासा ते अर्थसंकल्पाच्या कामाला सुरुवात, वाचा आजच्या टाॅप बातम्या