थिरूवनंतपूरम – माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या रूपाने पत्रप्रपंच करणारे कॉंग्रेसमधील आणखी एक ज्येष्ठ नेते स्वपक्षीयांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यातून थरूर यांना कॉंग्रेसमधील पाहुणा कलाकार अशी उपमा देण्यात आली.
कॉंग्रेसच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना काही दिवसांपूर्वी एक पत्र पाठवले. त्यातून पक्षात संघटनात्मक पातळीवर तातडीने सुधारणा करतानाच पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्याची मागणी करण्यात आली. त्यावरून पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. पत्रप्रपंच करणारे पक्षातील इतर नेत्यांच्या टीकेचे धनी बनत आहेत.
याआधी माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी झाली. आता पत्र मोहिमेत सहभागी झालेले थरूर लक्ष्य ठरले आहेत. केरळ प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष आणि पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद के. सुरेश यांनी थरूर यांचा उल्लेख पाहुणा कलाकार म्हणून केला.
कॉंग्रेसच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होण्याआधी थरूर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध पदांवर कार्य केले. त्याचा संदर्भ देऊन सुरेश म्हणाले, थरूर हे निश्चितच राजकारणी नाहीत. ते कदाचित जागतिक नागरिक असतीलही. पण, म्हणून त्यांनी मनाला येईल तसे बोलू नये. त्यांना पक्षाच्या धोरणांनुसार चालावे लागेल.