नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शंकराच्या पिंडीवर बसलेल्या विंचवासारखे असल्याची टिपण्णी केल्याप्रकरणी कॉंग्रेस नेते शशी थरुर यांना आज स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
शशी थरुर यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये वादग्रस्त विधान केले होते. मोदी हे पिंडीवरचे असे विंचू आहेत की, ज्याला तुम्ही आपल्या हाताने काढू शकत नाही किंवा चपलेने मारुही शकत नाही, असे त्यांनी म्हटले होते. बेंगळुरु लिट फेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या थरुर यांनी आपल्याच पुस्तकातील काही पाने उपस्थितांसमोर वाचून दाखवली होती. यात त्यांनी हा उल्लेख केला होता.
या विधानावरुन वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी शशी थरुर यांच्याविरोधात दिल्लीत तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी दिल्लीतील न्यायालयात सुनावणी झाली. शुक्रवारी न्यायालयाने शशी थरुर यांना 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. आता याप्रकरणी पुढील सुनावणी 25 जुलै रोजी होणार आहे. पुढील सुनावणीला तक्रारदार आणि भाजप नेते राजीव बब्बर यांचा जबाब घेतला जाणार आहे.