नवी दिल्ली : अमेरिकेने भाजपचे आरोप फेटाळल्यानंतर त्या पक्षावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपची वर्तणूक भारतापुढे अडचणी निर्माण करणारी आहे. त्या पक्षाला लोकशाही आणि मुत्सद्देगिरीही समजत नसल्याचे स्पष्ट होते, असे थरूर यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांना लक्ष्य करणारे बदनामीकारक हल्ले होत आहेत.
भारतात अस्थिरता निर्माण करण्याच्या उद्देशातून ते कृत्य होत आहे. त्यामागे अमेरिकेचा परराष्ट्र विभाग आणि त्या देशातील काही घटक आहेत, असे आरोप भाजपने केले. त्यावर तीव्र प्रतिक्रिया देत अमेरिकेने संबंधित आरोप निराशाजनक असल्याचे म्हटले. ओसीसीआरपी या मीडिया पोर्टलने दिलेल्या बातम्यांवरून आक्रमक पवित्रा स्वीकारत भाजपने अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाला घेरले. त्यावर भूमिका मांडताना अमेरिकेने आम्ही जगभरातील माध्यम स्वातंत्र्याचे नेहमीच समर्थन करत असल्याचे म्हटले.
अमेरिकेने प्रतिक्रिया दिल्यानंतर थरूर यांनी सोशल मीडियावरून भाजपवर निशाणा साधला. क्षुद्र राजकारणाने भाजपला आंधळे बनवले आहे. तो पक्ष लोकशाहीतील मुक्त माध्यमे आणि स्वतंत्र नागरी संघटनांचे महत्व विसरला आहे. महत्वाच्या देशांशी चांगले संबंध ठेवण्याच्या सत्ताधारी पक्षाच्या जबाबदारीची जाणीवही भाजपला राहिलेली नाही, असा शाब्दिक हल्लाबोल त्यांनी केला.