शशी कपूर : कपूर घराण्याचा समृद्ध वारस

आज साजरा केला असता 83 वा वाढदिवस

श्रीनिवास वारुंजीकर

अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून आपला ठसा हिंदी सिनेसृष्टीत उमटवलेल्या बलबीर राज कपूर अर्थात शशी कपूरचं मूळ नाव बलबीर राज कपूर आहे, हेच फारसं कुणाला माहिती असण्याची शक्‍यता नाही. (आज इंटरनेट आणि विकिपेडियाच्या जमान्यात असं म्हणता येत नाही म्हणा…) पण तरिही अभिनयाचा वारसा असलेल्या आणि एका समृद्ध सिनेघराण्याचा एक जीता-जागता वारस शशी कपूर आहे.

आपण सिनेमामध्ये का आलो, का येतो आणि आपल्याला नक्की काय साध्य करायचं आहे; नाव पैसा की प्रसिद्धी असे प्रश्‍न आज सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या प्रत्येकाला पडतात, पडावेत आणि त्यात वावगं काही आहे, असंही नाही. सिनेसृष्टी म्हणजे बेभरवशाचा व्यवसाय असं गणित ज्या काळात होतं, त्या काळा-पांढऱ्या चित्रपटांच्या युगापासून डॉल्बी डिजिटल युगाचा साक्षीदार होण्यापर्यंतची कारकिर्द शशी कपूरच्या वाट्याला आली.

साधारणपणे सन 1948 पासून रुपेरी पडद्यावर कार्यरत असलेल्या शशी कपूरला नाव, पैसा आणि प्रसिद्धी यापैकी काहीच कमवायचे नव्हते. वडील पृथीराज कपूर यांच्या रुपाने सिनेसृष्टीतील एका जित्या-जागत्या दंतकथेचा समृद्ध वारसा शशी कपूरला मिळाला होता. बंधू राज कपूर आणि शम्मी कपूर यांनी आपला अमीट असा ठसा आधीच उमटवलेला होता. तसे पहायला गेले तर कपूर घराण्याची चौथी पिढी सध्या सिनेसृष्टीत कार्यरत आहे. म्हणजेच 100 वर्षे पूर्ण केलेल्या जवळपास 90 टक्के कालखंडाचे साक्षीदार असलेला परिवार म्हणूनच कपूर खानदानाकडे पहावे लागते. त्या दृष्टीने विचार करता शशी कपूरवर जी जबाबदारी होती, ती मानमरातब, पैसा, प्रसिद्धी यापेक्षा मोठी होती; आणि ती म्हणजे कपूर खानदानची इज्जत, प्रतिष्ठा सांभाळायची आणि होता होईल तेवढी आपल्या परीने या प्रतिष्ठेत भर घालायची. अखेरपर्यंत कोणत्याही वादाच्या केंद्रस्थानी न पडता, शशी कपूरने आपली ही जबाबदारी समर्थपणे पेलली.

सन 1948 मध्ये बाल कलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलेल्या शशी कपूरला सन 1961 मध्ये बी. आर. चोप्रा यांच्या धर्मपुत्र या सिनेमात प्रथम नायकाची भूमिका मिळाली होती. त्यावेळी त्यांची नायिका होती इंद्राणी मुखर्जी तर माला सिन्हा शशीची जन्मदात्री आई होती. कपूर घराण्यातील सारेच सदस्य देखणेपणाच्या आणि गोरेपणाच्या बाबतीत अगदी काश्‍मीरी गोरे. अगदी तसाच उजळ गोरेपणा घेऊन पडद्यावर अवतरलेला हा देखणा हिरो, सिनेमाच्या पडद्यावर अधिकच देखणा दिसत असे. नाकेला चेहरा, नायकाला साजेशी उंची, सहजसोपी संवादफेक आणि ओढून-ताणून अभिनय करण्याची गरज नसल्याची जाणीव असलेला शशी कपूर म्हणजे अनेक तरुणींच्या दिलाची धडकन बनून गेला होता. त्याच्या “जब जब फूल खिले’ या म्युझिकल सिनेमाने सिल्व्हर ज्युबिली साजरी केली, ती शशी कपूरच्या सहजसुंदर, नैसर्गिक अभिनयानेच. आपण अभिनयाचे शहेनशहा नाही आहोत, मात्र, दिग्दर्शकाने जे सांगितले ते सहीसही उतरवण्यात आपण कुठेही कमी पडत नाही, याची सार्थ जाणीव असलेला आणि कॅमेऱ्याच्या फ्रेममधून दिसणाऱ्या चौकटीबाहेर न जाता, आपली छाप पाडण्यात यशस्वी कसं ठरायचं, याचं पुरेपूर ज्ञान असलेला शशी कपूर म्हणजे देव आनंद नंतरचा चॉकलेट बॉय म्हणायला हरकत नसावी. सिनेसृष्टीतील प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी 116 सिनेमांमध्ये काम केले त्यांपैकी तब्बल 61 सिनेमांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या.

सन 1960 चे दशक म्हणजे भारतीय सिनेसृष्टीचा “गोल्डन एरा’ अर्थात सोनेरी कालखंड मानला जातो. अर्थातच या सोनेरी कालखंडाचा अत्यंत जवळचा साक्षीदार होण्याचे भाग्य ज्या अभिनेत्यांना लाभले, त्यात शशी कपूर एक अग्रणी मानला जातो. “हरवला-सापडला’ या फॉर्मॅटमधला अत्यंत गाजलेला बी. आर. चोप्रा यांच्या “वक्त’ (1964) मधला विजयकुमार, म्युझिकल “प्यार किये जा’ (1970) मधला अशोक वर्मा, समीर गांगुलीच्या “शर्मिली’ (1971) मधला राखीबरोबरचा अजित कपूर, रोटी कपडा और मकान (1974) मधला मोहन बाबू या भूमिकांनी सतत सिनेरसिकांच्या मनात घर केलेल्या शशी कपूरने प्रथमच “दीवार’ (1975) मध्ये अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चनसमवेत अभिनयाची जुगलबंदी घडवली. नंतर ही नायकांची जोडी “कभी कभी’ (1976) “इमान धरम’ (1977), “त्रिशुल’ (1978), “सुहाग’ आणि “काला पत्थर’ (दोन्ही 1979), “दो और दो पॉंच’ आणि “शान’ (दोन्ही 1980), “नमक हलाल’ (1982) अशा अनेक चित्रपटांतून झळकली.

कोणत्याही मोठ्या स्टारचे स्टारडम अंगावर येवू न देता आणि आपल्या भूमिकेशी प्रामाणिक रहात शिस्तबद्ध रितीने सिनेसृष्टीत वावरणारे शशी कपूरसारखे फार कमी अभिनेते असतील. त्याच्या सिनेमात त्याला मिळालेल्या सर्वच नायिकांशी त्याने अत्यंत उत्तम जमवून घेतले. पूर्वी एखाद्या नायिकेला लॉन्च करण्यासाठी देव आनंद किंवा शम्मी कपूरसारख्या नायकाचा लॉन्च पॅड म्हणून वापर केला जात असे. अगदी त्याच्या जवळ जाणारा लौकीकही शशी कपूरने हासिल केला होता. त्याच्या नायिकांमध्ये राखी (शर्मिली) पासून झीनत अमान पर्यंत (सत्यम शिवम सुंदरम) तर शबाना आज़मी (फकिरा) पासून परवीन बाबी (नमक हलाल) पर्यंत विविध नायिकांचा भरणा होता. मात्र, कोणाही अभिनेत्रीबरोबर त्याचे नाव जोडले गेले नाही किंवा त्या सर्व प्रकारच्या गॉसिपपासून दूरच रहाणे शशी कपूरने कायम पसंत केले.

“जुनून’ “कलयुग’, “36 चौरंगी लेन’, “विजेता’, आणि “उत्सव’ या सिनेमांचे निर्माण करुन दर्जेदार सिनेमांचे मापदंडही शशी कपूरने घालून दिले. त्याचप्रमाणे “अजुबा’ सिनेमाच्या वेळी त्याने दिग्दर्शनही केले.

भारतीय सिनेसृष्टीतील प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवलेल्या शशी कपूरला सन 2011 मध्ये “पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. या हरहुन्नरी अभिनेत्याने तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले. त्यामध्ये “जुनून’, “न्यू दिल्ली टाइम्स’ आणि “इन कस्टडी’ या तीन सिनेमांचा समावेश होता. नायक आणि सहाय्यक अभिनेता म्हणून अनेक फिलमफेअर ऍवॉर्डससह अनेक पुरस्कारांवर नाव कोरलेल्या शशी कपूरने पृथ्वी थिएटर्सच्या माध्यमातून नाट्य परंपरेलाही मोठा आकार दिला होता आणि पृथ्वी नाट्य महोत्सव देशाच्या काना-कोपऱ्यात नेण्यात त्याने पत्नी जेनिफर केंडेलसह मोठे योगदान दिले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.