राग शमवणारे, दमेकऱ्यांना लाभदायक शशांकासन

शशांकासन हे आसन करताना प्रथम बैठक स्थितीत यावे. बैठक स्थितीतून वज्रासनात जावे, म्हणजेच दोन्ही पाय मागे घेऊन टाचांच्या अर्धचंद्रात बसावे. श्‍वास घ्यावा आणि श्‍वास सोडत दोन्ही हात सरळ जमिनीकडे न्यावे.

श्‍वास सोडतच कमरेतून खाली वाकावे, डोके गुडघ्याला लावून किंवा गुडघ्याच्या पुढे जमिनीवर टेकवावे. हात लांब केलेल्या अवस्थेत थोडीशी हाताची कोपरे वाकवून आसनस्थिती पूर्ण करावी, कपाळ जमिनीला टेकवून आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रीत करावे. आसन स्थिती घेताच शरीर शिथिल करावे.

थोडा वेळ या आसनात स्थिर रहावे. जसजसा प्रत्येक अवयव शिथिल होत जाईल तसतशी शरीराला विश्रांती मिळेल आणि शरीराबरोबर मनालाही विश्रांती मिळते.
शिर्षासन केल्यानंतर विश्रांतीसाठी हे आसन करतात. शरीर शिथिलीकरणामुळे मन शांत होते म्हणूनच शशांकासनात राग घालविण्याचे सामर्थ्य आहे असे म्हटले जाते.

ज्या लोकांना दमा झालेला असतो व सतत धाप लागत असते त्यांनी नियमित या आसनाचा सराव करावा. सुरुवातीला तीस सेकंदापर्यंत टिकवावे पण नियमित सराव आणि शिथिलीकरणामुळे कालावधी हा पाच मिनिटांपर्यंत वाढवता येतो. शशांक म्हणजे ससा अथवा चंद्र. त्याचे आसन म्हणजे चंद्रासन असेही कोणी कोणी या आसनाला म्हणतात.

चंद्रासारखे शितल मन होते म्हणून याला चंद्रासन असेही नाव आहे. या आसनाने मलावरोध दूर होतो. वज्रासनाचे फायदेही मिळतातच या शिवाय गुडघेदुखी बरी होते, पोटऱ्या दुखत असतील तर त्यांना आराम मिळतो, एकंदर शशांकासनात शरीराला पूर्णपणे विश्रांती मिळून शरीरातील क्रोध मत्सर आदी भावनांचा नाश होतो.

सुरुवातीला हे आसन जाड व्यक्‍तींना कमी कालावधीसाठी दिले जाते पण नंतर सरावाने जास्त वेळ टिकवता येते. पोटातील चरबी घटते. तसेच ओटीपोटातील विकारही दूर होतात. प्रत्येकाने दिसायला व करायला सोपे व सहज असलेले शशांक आसन जरूर करावे. या आसनामुळे पचनेंद्रीय सुधारते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.