मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलं आहे. दरम्यान, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्को संकुलात हे अधिवेशन पार पडणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सकाळी या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे.
या अधिवेशनात मनसेचा झेंडा नव्या स्वरूपात सादर केला जाणार आहे. तसेच या अधिवेशनात राज ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच राजकीय वर्तुळात या अधिवेशनात राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे सक्रीय राजकारणात एण्ट्री करणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, अमित ठाकरे हे सक्रीय राजकारणात एण्ट्री करणार असल्याची चर्चेबाबत राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना वृत्तमाध्यमांनी प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग होणार का?’ असा प्रश्न विचारल्यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, ‘माहीत नाही. पण झालंच तर आनंद होईल. अधिवेशनाबाबत मोठा सस्पेन्स आहे.’ दरम्यान, मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनाला मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हजर राहणार असल्याची माहिती आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरला अधिवेशनासाठी 20 ते 25 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.