लंडन – करोनावरील लस तयार करण्यासाठी शार्क माशांची वेगाने शिकार केली जात असून अशीच जर स्थिती राहीली तर जगभरात दीड लाखांपेक्षा जास्त शार्क मारले जातील असा इशारा प्राणीतज्ञांनी दिला आहे.
शार्क माशाच्या शरीरात तयार होणाऱ्या स्क्वॅलीन नावाच्या एका खास तेलासाठी त्यांची शिकार केली जात आहे. हे एक नैसर्गिक तेल असून तापावरील लशीची क्षमता वाढवण्यासाठी या तेलाचा उपयोग केला जातो असे तज्ञांचे म्हणणे आहे.
सध्याच्या काळात करोनावर उपाय म्हणून ज्या लशी तयार केल्या जात आहेत, त्यांची परिणामकारकता वाढवण्यासाठी याच स्क्वॅलीन तेलाचा उपयोग केला जातो आहे. विज्ञानाने अद्याप तेलाच्या उपयुक्ततेला दुजोरा दिला नसला तरी त्याचा वापर जोरात सुरू आहे.
जगभरातील सगळ्याच नागरिकांना जर करोनाची लस द्यायची झाली आणि त्यासाठी हे तेल वापरले गेले तर त्याकरता तब्बल 2 लाख 40 हजार शार्क मारावे लागतील असेही तज्ञांनी म्हटले आहे. तर काही तज्ञांच्या मते लशीची प्रत्येकी दोन डोस द्यावे लागतील असे आतापर्यंत अनेक तज्ञांनी म्हटले आहे. ते जर खरे असेल तर यात मारल्या जाणाऱ्या शार्कची संख्या पाच लाखांच्याही वर जाउ शकते.
तसे जर झाले तर ते आपल्या पर्यावणासाठी अत्यंत घातक ठरणार आहे. याच वेगाने जर माशांची शिकार केली जात राहीली तर त्यांच्या जाती नामशेष होतील असा इशाराही देण्यात आला आहे.