लाहोर – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांबरोबरच आता देशद्रोहाचा आरोपही ठेवण्यात आला आहे. नवाझ शरीफ, त्यांच्या कन्या मरियम आणि पीएमएल-एन पक्षाच्या प्रमुख नेत्यांविरोधात लष्कर अणि न्यायपालिकेच्या विरोधात कारस्थान केल्याचा आणि या यंत्रणांविरोधात लोकांना भडकावण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
शरीफ यांनी लंडनवरून व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून केलेल्या दोन भाषणांची दखल घेऊन करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे लाहोर पोलिसांनी या संदर्भात ‘एफआयआर’ दाखल केली आहे. 2018 सालच्या निवडणुकीत पाकिस्तानच्या लष्कराने हेराफेरी करून इम्रान खान यांच्या पक्षाला विजय मिळवून दिला होता, असा आरोप शरीफ यांनी केला होता.
चौधरी शुगर मिल्स आणि अल झिझिया या प्रकरणांमध्ये जामीन मिळाल्यानंतर गेल्या वर्षी शरीफ लंडनला रवाना झाले आहेत. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार आणि पाकिस्तानमधील लष्कर, न्यायपालिकांना ते सातत्याने लक्ष्य करत आहेत.
तीन वेळेस पाकिस्तानचे पंतप्रधान राहिलेल्या नवाझ शरीफ यांच्याविरोधात सायबर दहशतवाद, गुन्हेगारी कारस्थान, देशाविरोधात युद्ध पुकारण्यासाठी कारस्थान, देशाच्या संस्थापकांची टीका, सार्वभौमत्व झुगारून देण्याची आग्रही भूमिका, देशद्रोह अणि विविध गटांमध्ये वितुष्ट निर्माण करणे, आदी गुन्ह्यांसाठी पाकिस्तान पीनल कोड आणि पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक गुन्हे कायद्यांतर्गत शरीफ यांच्याविरोधात प्रकरण दाखल करण्यात आले आहे.